कोकणात औद्योगिक क्रांती घडवणार: ना. राणे

रत्नागिरी:-कोकणात औद्योगिक क्रांती  व्हावी यासाठी मी काम करणार आहे. यापुढे मी अधिकार्‍यांना घेऊन येईन असे सांगत सिंधुदुर्गात सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर उभं करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीयमंत्री ना. नारायण राणे यांनी केले ते रत्नागिरीत पत्रकारपरिषदेत बोलत होते.

नाम. नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा शुक्रवारपासून सुरु झाली. यावेळी रत्नागिरीत आलेल्या नाम. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून आपल्या यात्रेची माहिती दिली. ते म्हणाले की, यात्रेत खूप अनुभव आले आणि जनतेचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला. जनतेचे जे काही प्रश्‍न आहेत ते जाणून घेण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्याने त्याची मदत मिळाली का? आपत्तीग्रस्तांचे दु:ख काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलो असल्याचे नाम. राणे यांनी सांगितले. ही जन आशिर्वाद यात्रा पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोनामुळे १ लाख ५७ हजार नागरिकांचा मृत्यू झाला. देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आणि ही यांची ख्याती असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
बंधनं केवळ आमच्यासाठी आहेत, आमच्या देशात आम्हाला मनाई का? ज्यावेळी मनाई करायची  वेळ होती त्यावेळी केली नाही आणि आता सर्व संपल्यानंतर मनाई लागू करत आहेत. आम्हाला विरोध करुदे ही सत्तेची मस्ती आहे. मात्र राज्यात कायदासुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे? असा प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थित केला. घरात घुसून बलात्कार, दरोडे, खून, मारामार्‍या असे प्रकार सुरु आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांंगितले.

८० टक्के कारखाने, उद्योगधंदे हे माझ्या अख्त्यारित येतात. त्यामुळे कोकणात औद्योगिक क्रांती व्हावी यासाठी मी काम करणार आहे. २०० कोटी रुपये खर्च करुन सिंधुदुर्गात सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर उभं करणार असल्याचे नाम. राणे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेने दोन वर्षात कोकणला काय दिलं. येथील जिल्हा परिषद दिवाळखोरीत, येथील रस्ते ते देखील पाहिले. हा कारभार जनतेला दाखवणार आणि हाच त्यांचा पराक्रम असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
यापुढे कोकणात भाजपचेच आमदार, खासदार निवडून येतील याची दक्षता मी घेणार आहे. रत्नागिरीच्या आमदारांनी कधी विधानसभेत तोंड उघडले का? असा सवाल करत पालकमंत्रीदेखील बाहेरचे… कोकणला न्याय अद्याप मिळाला नाही. कोकणी माणसानेच शिवसेनेला आधार दिला. त्यावेळी कोण नव्हतं, आता जे आहेत ते पाहुणे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

सिवर्ल्ड प्रकल्प हा मीच घेवून आलो… यांनी एक दगड तरी लावला का? कोकणात उद्योग यावेत हे कोणाला कधी सुचले तरी का? असे सांंगून गणेशोत्सवानंतर चीपी विमानतळावरुन पहिले विमान उडेल… असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.