कोकणातून एकही प्रकल्प परत जाणार नाही

उद्योगमंत्री उदय सामंत ; इलेक्ट्रीक बॅटरी प्रकल्पासाठी प्रयत्न

रत्नागिरी:- आतापर्यंत कोकणात विरोधामुळे अनेक प्रकल्प होऊ शकत नाहीत. आता तंत्रज्ञानात बदल झाला असून प्रदूषणविरहित प्रकल्प येत आहेत. आता कोकणात येणारा एकही प्रकल्प परत जाणार नाही, असा विश्‍वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून दूरचित्रसंवाद यंत्रणेच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महाराष्ट्रात जास्तीत जास्त प्रकल्प यावेत यासाठी दावोस दौर्‍यावर असलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी दूरचित्रसंवाद यंत्रणेच्या माध्यमातून बुधवारी (ता. १८) सायंकाळी संवाद साधला होता. राज्यात मागील सरकारच्या कालावधीत काही कंपन्यांबरोबर गुंतवणूक करार झाले. मात्र त्यातील अनेक करार केवळ कादावर राहिले आहेत. यावेळी दावोस येथे करण्यात आलेल्या सर्व सामंजस्य करारांची अंमलबजावणी होईल आणि राज्यातील तरुणांचे रोजगाराचे स्वप्न साकार होईल. या करारातून राज्याच्या विविध भागांत गुंतवणुक करणार्‍या उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जमीन, पाणी, वीज व अन्य करसवलती प्राधान्याने दिल्या जाणार आहेत. कोणत्याही उद्योगाला आवश्यक सर्व परवानग्या अर्जाच्या तारखेपासून ३० दिवसांत मिळाल्याच पाहिजेत. यासाठी कायदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नव्या कायद्यानुसार एखाद्या विभागाने ३० दिवसात परवानगी दिली नाही तर परवानगीचे सर्वाधिकार विकास आयुक्तांना मिळतील. याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर आणला जाणार आहे.

महाराष्ट्राबरोबरच कोकणातही प्रकल्प आणण्यात येणार आहेत. इलेक्ट्रीक बॅटरीच्या प्रकल्पासाठी आवश्यक जागा रत्नागिरीत उपलब्ध करुन देण्यात येईल. त्या प्रकल्पांना कोकणात विरोध होणार नाही, याची काळजी घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले असून प्रकल्पातून प्रदुषण होणार नाही याची खात्री दिली कोकणवासीयांना दिला जाईल. आजवर जनतेस समजवाण्यात आम्ही कमी पडलो. ज्या देशांच्या अनेक उद्योजकांना आम्ही भेटलो, त्यांच्याकडे आधुनिक तंत्र आहेत. त्यामुळे कोकणात आलेला प्रकल्प परत जाणार नाही, यासाठी स्थानिक शेतकर्‍यांना आम्ही विश्‍वासात घेऊ, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

विरोधकांचे नाहक राजकारण

विरोधकांना चिमटा काढताना मंत्री सामंत म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असून त्यांचे स्वागत करण्याऐवजी विरोधक मात्र नाहक राजकारण करीत आहेत. चांगल्या कामांचे कौतुक करण्याचे औदार्य विरोधकांमध्ये नाही.