रत्नागिरी:- भावोजी कुठे आहेत मला माहित नाही असे सांगितल्याच्या रागातून सख्या भावानेच भावाला लाकडी दांड्याने मारुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित मोठ्या भावाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन चंद्रकांत खेत्री (२५, रा. क्रांतीनगर, झोपडपट्टी-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १६) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मराठी शाळेजवळ, कोकणनगर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आकाश चंद्रकांत खेत्री (२२, रा. विशाल नाचणकर चाळ, कोकणनगर, रत्नागिरी) यांना संशयित सचिन याने फोन करुन त्यांच्या घरी बोलावून घेतले व त्यांना भावोजी कुठे आहेत अशी विचारणा केली. त्यावेळी आकाश याने ते कुठे आहेत मला माहित नाही असे सांगितले. याचा राग मनात धरुन संशयित सचिन याने आकाश यांच्या डोक्यात दांडक्याने प्रहार करुन दुखापत केली व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आकाश खेत्री याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.