राजकीय पुढाऱ्यांसह वडिलांनी केले होते पोलिसांवर आरोप
रत्नागिरी:- माझ्या मुलाचे अपहरण झाले आहे.त्याचे काही बरे वाईट होऊ शकते, शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे, परंतु पोलीस योग्य तपास करत नाहीत असा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला होता. परंतु आता शहर पोलिसांनी साकीब अब्दुल सत्तार अब्दुल रहिमान कासू याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्याने विविध मित्रांकडून सुमारे 70 हजार रुपये उसने घेऊन बायनान्स अँपद्वारे ट्रेडिंग करताना बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे. उसने घेतलेले पैसे मित्र परत मागत असल्याने साकिब घर सोडून गेल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एका राजकीय पक्षांच्या तालुका स्तरावरील पुढाऱ्यांना सोबत घेऊन मुलाच्या वडिलांनी शहर पोलिसांवर केलेले आरोप निष्फळ ठरले आहेत. आता खोटे आरोप करायला लावल्या प्रकरणी शहर पोलीस त्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी शहरातील कोकण नगर नजीकच्या आझाद नगर येथील अब्दुल कासू यांचा 22 वर्षीय मुलगा साकिब कासू हा दि.6 डिसेंबरला घरातील कोणालाही काही न सांगता बेपत्ता झाला होता. त्यानंतर अब्दुल कासू यांनी त्याच दिवशी मुलगा बेपत्ता झाली तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल केली होती. बेपत्ता साकीबचा शोध शहर पोलीस घेत होते. परंतु साकिब स्वतःचा मोबाईल बंद ठेवून मित्राच्या सिमकार्द्वारे मोबाईल वापरत होता. त्यामुळे साकीबला शोधून काढण्यात पोलिसांना अडचण निर्माण होत होती,परंतु पोलिसांनी साकिबचा शोध सुरू ठेवला होता.
दरम्यानच्या कालावधीत साकीबचे वडील अब्दुल कासू यांनी एका ‘नवे’ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजकीय पक्षाच्या पुढार्यांना सोबत घेऊन शहर पोलीसांबद्दल पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली होती. तर शहर पोलिसांनाही आमच्या स्टाईलने आंदोलन करू असा धमकी वजा इशारा त्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता.परंतु पोलीस साकिबचा शोध घेत होते. अखेर साकीब पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक बी.डी. वनवे,पोलीस नाईक वैभव नार्वेकर यांनी पुणे येथे जाऊन साकीबला ताब्यात घेतले.रविवारी रात्री साकीबला शहर पोलीस स्थानकात आल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
साकिब हा बायनान्स ॲपद्वारे मित्रांकडून उसने पैसे घेऊन ट्रेडिंग करत होता.परंतु यामध्ये तो बुडाला होता. मित्र उसने घेतलेले पैसे वारंवार मागत होते. या सर्वांपासून वाचण्यासाठी स्वतःहून घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने दिलेल्या जबाबतून स्पष्ट झाले आहे. साकीबला शहर पोलिसांनी वडिलांच्या ताब्यात दिले आहे तर या तक्रारीची चौकशी सुरू आहे.
साकीबचे अपहरण झालेले नसताना पोलीस आपल्या पद्धतीने बेपत्ता तरुणाचा शोध घेत असताना एका राजकीय पक्षाच्या पुढारी थेट पोलिसांना इशारा दिल्याने त्याप्रकरणी त्या पुढऱ्यावरही कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.