केशवसुत स्मारकासाठी 1 कोटी रुपयांचा निधी

मालगुंड येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण प्रसंगी मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांची घोषणा

रत्नागिरी:- विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी रविवारी करतानाच साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही, असेही सांगितले.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गंगाराम गवाणकर, कवी अरुण म्हात्रे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मराठी भाषा संचालक डॉ. शामकांत देवरे, उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी साठे, सरपंच स्वेता खेऊर आदी उपस्थित होते.

मराठी भाषा तथा पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषा विभाग हे खातं मी मागून घेतलं आहे. कोकणाला साहित्यिकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी भाषेचा मंत्री झाल्यावर माझ्या हातून मंगेश पाडगावकरांच्या गावी कवितेचे दालन पुस्तकांचे गाव, कुसमाग्रजांच्या शिरवाडे गाव पुस्तकांचे गाव सुरु करण्याचे नियतीच्या मनात असावे. साहित्यिकांचा पुरस्कार सोहळा गेट वे ऑफ इंडिया येथे दोन दिवस घेतला. विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात घेतले. पहिला साहित्य भूषण पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना देण्याचे भाग्य लाभले. ज्ञानेश्वरांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली त्याचवेळेला मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिध्द झालेले आहे. एकनाथांनी अभंग लिहिले त्याचवेळी मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिध्द झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा उपयोग केला, त्याचवेळेला मराठी भाषा अभिजात झालेली होती, असे सांगून मराठी मंत्री उदय सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो. कवी केशवसुत, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक यांचा आदराने उल्लेख लंडनमध्ये झाला होता. कोकणाने राज्याला दिलेले साहित्यिक पाहता कोकण साहित्याच्या दृष्टीने प्रगत आहे. हे साहित्य आपण सर्वांनी पोहचविले पाहिजे.

यापुढे बालसाहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन होईल. या प्रत्येक साहित्य संमेलनासाठी पाच पाच कोटींची तरतूद केलेली आहे, असे सांगून डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषेत ताकद आहे. मराठी भाषा ताकदवान करण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. देशाच्या सांस्कृतिक विभागाचा पाया हा साहित्यिक आहे. जोपर्यंत साहित्यिक नाटक लिहीत नाही तोपर्यंत नाटक रंगमंचावर येत नाही.

अनेकांनी याचा अभ्यास केला पाहिजे. जे काही संगीत निर्माण होतं, गाणी निर्माण होतात, जे काही नाटके निर्माण होतात, जे काही चित्रपट निर्माण होतात, जर साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ आपल्या सगळ्या सांस्कृतिक परंपरेचा पाया हा आपल्या महाराष्ट्रातील साहित्यिक आहेत. कवी केशवसुत स्मारक हे माझ्या मतदार संघात आणि तुमच्या मालगुंड गावामध्ये आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे आणि तो अभिमान आपण ठेवावा, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात पद्मश्री श्री. कर्णिक म्हणाले, कवी केशवसुत मालगुंडला जन्माला आले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. एका हातात भाकरी असेल तर ती भाकरी आपल्याला जगवेल. दुसऱ्या हातात पुस्तक असेल तर का जगावं हे ते पुस्तक सांगेल. संचालक डॉ. देवरे यांनी पुस्तकांच्या गाव या मागील शासनाची भूमिका सांगितली. कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अरुण म्हात्रे यांनी शिपाई कविता सादर केली. विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी स्वागत प्रास्तविक केले. आनंद शेलार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. मालगुंड ग्रामपंचायतीत प्रथम पुस्तक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास जयु भाटकर, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, सुनिल मयेकर, नलिनी खेर आदींसह साहित्यिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

साहित्य चळवळीसाठी आजचा क्षण अत्यंत महत्वाचा: नमिता कीर 

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षे सातत्याने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृंद्धीगत करण्यासाठी कोमसापच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आजचा उपक्रम हा मनाला सतत उभारणी देणारा आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांचे जन्मगाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर होत आहे. हा मराठी साहित्य चळवळीतील अत्यंत महत्वाचा क्षण आहे असे गौरवोद्गार कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी काढले. शासनाने मालगुंड गाव पुस्तकांचे म्हणून जाहीर केले आहे. आता मालगुंड गावाची ओळख संपूर्ण जगात साहित्यिक गाव म्हणून झाली आहे. त्यामुळे यापुढे मालगुंड आणि मालगुंड परिसरातील लोकांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद करा: रमेश कीर

कवी केशवसुत यांचे मूळ जन्मघर मालगुंड येथे चांगल्या स्थितीत आहे याचे पूर्ण श्रेय पालकमंत्री उदय सामंत यांनाच आहे. जेव्हा जेव्हा आम्ही ना. सामंत यांच्याकडे स्मारकाच्या कामासंदर्भात गेलो त्या त्या वेळी ना. सामंत यांनी आमची मागणी तत्परतेने पूर्ण केली. आता या स्मारकाला तीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी नव्याने निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. यासाठी ना. उदय सामंत यांनी निधीची तरतूद करावी अशी मागणी संस्थेचे प्रमुख विश्वस्त रमेश कीर यांनी आपल्या भाषणात केली. स्मारकाच्या नूतनीकरणासह देखभाल दुरुस्तीसाठी देखील शासनामार्फत निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे कारण या स्मारकासोबत आपण सर्व जोडले गेलेलो आहोत. या स्मारकाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करून तो ना. सामंत यांना दाखवला जाईल आणि पुढील १५ ते २० वर्षे दर्जेदारपणे उभे राहील असे स्मारक उभारू असे मनोगत रमेश कीर यांनी व्यक्त केले. 

भाषणाच्या सुरुवातीलाच रमेश कीर यांनी मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांचे आभार मानले. मागील पाच ते सहा वर्ष कोमसाप मार्फत मालगुंड पुस्तकांचे गाव व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. ना.सामंत यांच्याकडे आता दुसऱ्यांदा या विभागाचा पदभार आल्यानंतर आम्हाला आज हा आनंद प्राप्त झाला असल्याचे रमेश किर यावेळी म्हणाले.