केळवडे खून प्रकरणातील दोघांची निर्दोष मुक्तता

राजापूर:- तालुक्यातील केळवडे येथील दीपक राजाराम गुरव याच्या मृत्यूप्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेल्या संशयित आरोपी संजय उर्फ बंड्या महादेव मुगे व सह आरोपी विजय जाधव यांची जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सहसत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी संशयित आरोपी संजय मुगे याच्यावतीने राजापुरातील ॲड. शशिकांत सुतार व ॲड. प्रवीण नागरेकर यांनी काम पाहिले. तर विजय जाधव याच्यावतीने ॲड. आदेश चवंडे यांनी काम पाहिले.

तालुक्यातील केळवडे येथील दीपक राजाराम गुरव हे ४ फेब्रुवारी २०२२ केळवडे वरची गुरववाडी कावनासखळ इरव या जंगल भागामध्ये गुरे चारण्यासाठी गेले असताना त्यांचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी संजय उर्फ बंड्या महादेव मुगे याच्याविरोधात प्रारंभी भा.दं.वि. कलम ३०७ व दीपकचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. तर भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ नुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर संजय मुगे यांना काडतुसे ही इंदवटी येथील विजय जाधव यांनी पुरवली असल्याचा आरोप असल्याने त्यालाही या प्रकरणी सहआरोपी करण्यात आले होते.

दीपक गुरव उर्फ बाबू राजाराम गुरव याने त्याच्या गावातील पोलीस पाटील सुनील गुरव यांना चार अपत्य असल्याने त्याचे पोलीस पाटीलपद रद्द व्हावे यासाठी उपोषण केले होते. पोलीस पाटील गुरव यांना संशयित आरोपी संजय मुगे हा समर्थन करत होता व त्याचा सख्खा भाऊ गोविंद मुगे याचा गावचा गावकर म्हणून मृत दीपक समर्थन करत होता व गावातील नळपाणी योजनेवरून मृत दीपक व संजय मुगे यांच्यामध्ये वाद होता. या गोष्टीचा राग मनांत धरून संशयित आरोपी संजय मुगेने दीपक गुरववर बंदुकीची गोळी झाडून खून केल्याचा दोषारोप ठेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित आरोपी दीपक मुगे यानंतर न्यायालयीन कोठडीत होता. पोलिसांनी या प्रकरणी त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सहसत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्यासमोर खटला चालवण्यात आला. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे २५ साक्षीदार तपासण्यात आले. दरम्यान सरकार पक्षाकडून सादर करण्यात आलेले सर्व साक्षी-पुरावे व आरोपीतर्फे सादर सर्व साक्षी-पुरावे विचारात घेऊन सरकार पक्ष हे आरोपीविरूध्द गुन्हा शाबित करण्यामध्ये यशस्वी झाले नसल्याचे जाहीर करून न्यायालयाने संशयित आरोपी संजय मुगेची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.