लांजा:- भक्षाच्या शोधार्थ आलेला नर जातीचा बिबट्या विहिरीचा अंदाज न आल्याने चाळीस फूट खोल विहिरीत कोसळला. केळंबे आंबेवाडी येथील ही घटना घडली असून रविवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे.
केळंबे आंबेवाडी येथे भर वस्तीत नारायण विष्णू कनावजे यांचे घर असून घरापासून जवळच त्यांच्या पाठीमागच्या बाजूला विहीर आहे. या विहिरीत पाणी देखील कमी आहे .नारायण कनावजे हे रविवारी पहाटे ६.३० वाजता नेहमी प्रमाणे विहिरीवर गेले होते. यावेळी विहीरीवर टाकलेली जाळी खाली पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी विहीरीच्या आतमध्ये वाकून पाहिले .त्यानंतर कनावजे यांनी जाळी ओढण्यास सुरुवात केली असता आतील बिबट्याने डरकाळी फोडली आणि विहीरीत टाकलेल्या पाण्याच्या मशीनच्या दोरीने वर येण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याला पाहताच नारायण कनावजे यांची बोबडी वळली आणि ते घाबरून घरामध्ये पळाले .
त्यानंतर याबाबतची माहिती पोलीस पाटील , सरपंच यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली आणि त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्या खोल विहिरीत पडलेला असल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजरा बंद करून त्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. यासाठी वनरक्षक सुरज तेली, विक्रम कुंभार ,रणजीत पाटील, आकाश कडोकर, अरुण माळी तसेच वनविभागे कर्मचारी मंगेश आंबेकर, सत्यवान गुरव, मयुरेश आंबेकर तसेच स्थानिक ग्रामस्थ संजय गोसावी, अमित लांजेकर, गणेश लांबोरे, विवेक कांबळे, बाळू झोरे, गणेश कोलापटे माजी पोलीस पाटील विजय खानविलकर ,सचिन विभुते आदींसह अन्य ग्रामस्थांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. सकाळी साडे अकराच्या सुमारास या बिबट्याला पिंजरा बाहेर काढले.सदर बिबट्या हा साधारण दिड वर्षाचा असुन तो नर आहे. सदर वन्यप्राण्यांस पशुसंवर्धन अधिकारी प्रजक्ता बर्गे लांजा यांच्या कडून वैद्यकीय तपासणी करून घेतली तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले
ही संपूर्ण मोहीम वनविभागाचे विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे तसेच मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी श्री निलेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले व रेस्कु ऑपरेशन सुरक्षित पार पाडले असून ,सदर कामगिरी साठी प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी , दिलीप आरेकर वनपाल लांजा , व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते .