रत्नागिरी:- पर्यटनाला चालना देतानाच महिलांना रोजगारसंधी देण्यासाठी केरळच्या धर्तीवर जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) सिंधु-रत्न योजनेत दोन कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे. या बोटी महिला बचत गट चालवणार आहेत.
हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी डीआरडीएमार्फत बचत गटातील बारा महिलांना केरळमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर हाऊसबोटींगसाठी सुरक्षित आणि परिपूर्ण असलेल्या जयगड आणि दाभोळ खाड्यांची निवड केली. दोन्ही खाड्यांचा परिसर निसर्गरम्य आहे. येथील किनार्यावर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पहायला मिळतात. दाट जंगल, मासे पकडण्याचा अनुभव येथे मिळू शकतो. पर्यटकांना एक रात्र बोटीमध्येच राहण्यासाठी सुरक्षित जेटीही उभारणे शक्य आहे. दोन्ही खाड्यांमध्ये प्रवासी बोटींसाठी शासकीय जेटी येथे आहेत. त्याचा वापर हाऊसबोटींसाठी होईल. एका बोटींमध्ये दोन कुटूंबे म्हणजेच आठ व्यक्ती राहतील अशी व्यवस्था असेल. एका बोटीची किंमत 80 लाख ते 1 कोटी रुपये आहे. यामध्ये वेलदूर ते चिपळूण 40 किलोमीटर तर जयगड ते तवसाळ-भातगाव पूल 22 किलोमीटर अंतर आहे. कांदळवन दर्शन, मगर सफर, उन्हवरेचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळे काझीची लेणी, ऐताहीसीक पुरातन मंदिरे, डॉल्फीन दर्शन. मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक, खाडीकिनारी असलेली पुरातन मंदिरे, फिश मसाज, कोकण कलांच दर्शन, बचत गटांच्या उत्पादनाचे विक्री केंद्राची पाहणी करता येईल. सिंधु-रत्न योजनेमध्ये हाऊसबोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. तसेच पर्यटकांना फिरण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे नऊ बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. एक बसची किंमत 40 लाख असून महिला बचत गटांना पर्यटन व्यावसायातून उत्पन्न मिळू शकेल. जिल्ह्यातील खाड्यांच्या संथ पाण्यात हाऊसबोटिंगच्या माध्यमातून महिला बचत गटांना पर्यटन व्यावसाय करणे शक्य आहे. त्यासाठीच दोन खाड्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवण्यात येत आहे. परिपूर्ण प्रस्ताव दिलेला असून लवकरच त्यावर कार्यवाही होईल. भविष्यात काजळी खाडीमध्येही हाऊसबोट सुरु करण्याचा विचार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.