कृषी पर्यवेक्षकाचा मृत्यू प्रकरणी ओमनी चालकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- चिपळूण गुहागर मार्गावरील कळवंडे फाटा येथे दुचाकीला मारुती ओमनीची धडक बसून दि. १० मे रोजी अपघात झाला होता. या अपघातात कृषी पर्यवेक्षकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित ओमनी चालक हेमंत सदाशिव परचुरे (५३, दोनवली, कीर्तनवाडी) याच्यावर रविवारी गुन्हा दाखल केला आहे.

मार्गताम्हाणे येथील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण ज्ञानू शिंदे (४८, आंधळगाव, मंगळवेढा, सोलापूर) हे मार्गताम्हाणे येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी ते मार्गताम्हाणे परिसरात निघाले होते.

याचदरम्यान १० मे रोजी सकाळी नऊ वाजता कळवंडे फाटा येथे पोहोचताच त्यांच्या दुचाकीला मारुती ओमनीची धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र रविवारी येथील पोलिसांनी लक्ष्मण शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी हेमंत सदाशिव परचुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.