रत्नागिरी:- अव्वाच्या सव्वा आलेल्या कृषी पंपाच्या विजबिलांवरुन सदस्यांनी महावितरण कंपनीविरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली. शेती पंप असलेल्या शेतकर्यांना आकारलेली ही बिले कृषीनुसार आकारली जावीत असा ठराव मालगुंड येथे झालेल्या पंचायत समितीच्या मासीक सभेमध्ये सर्वानुमते करण्यात आला. अधिकची बिले आलेल्यांचा सर्व्हे दोन महिन्यात करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.
सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली या टर्ममधील शेवटची मासीक सभा मालगुंड येथे झाली. सदस्यांची मुदत 23 मार्चला संपुष्टात येणार असल्याने ही सभा कार्यालयाच्या सभागृहात न घेता कवी केशवसुत स्मारक सभागृहात झाली. यावेळी गटविकास अधिकार्यांसह सर्व सदस्य उपस्थित होते. सुनील नावले, गजानन पाटील यांनी महावितरण, शिक्षणसह विविध विभागातील समस्यांवर प्रश्न उपस्थित केले. शेती पंप वापरणार्यांच्या विजेचेबिल अव्वाच्या सव्वा आले आहे. मागील मासीक सभेत या विषयावरुन महावितरण कंपनीला धारेवर धरण्यात आले होते. तक्रारी असलेल्या ग्राहकांशी संवाद साधून बिले कमी करुन देऊ असे आश्वासन दिले गेले; परंतु त्यावर महावितरणने कार्यवाही केली नाही. त्याचे पडसाद आजच्या सभेत उमटले. सुनील नावले यांनी गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. भरमसाठ बिले आलेल्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन ती कमी करुन द्यावीत असा ठरावही करण्यात आला आहे.
कोरोनातील तिसर्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागल्यानंतर शाळांचे कामकाज पुर्ववत होत आहे; मात्र रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील अनेक शिक्षक वेळेत शाळेत जात नाहीत. काहीजणं तर शाळेतच जात नाहीत. त्याचा मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे अशी तक्रार नावले यांनी मांडली. याची दखल घेतली जाईल आणि शिक्षकांना तशा सुचना करु असे गटशिक्षणाधिकार्यांनी सांगितले. महिला बचत गटांना कर्ज वाटप केल्याची माहिती दर सभेत दिली जाते; परंतु याचे वितरण करताना किंवा ते कोणाला द्यावे यावर निर्णय घेण्याचे अधिकार पंचायत समिती सभापती, सदस्यांना नाहीत. यंदा चौदा कोटी रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले. नुसतीच माहिती देऊन उपयोग नाही, तर गरजू गटांना त्याचा लाभ मिळाला पाहीजे यादृष्टीने सभागृहात मांडणी करावी अशी सुचना गजानन पाटील यांनी केली.
मालगुंड येथील कवीकेशवसुत यांच्या स्मारकासमोरील खाजगी जागेमध्ये खुप जुना अवाढव्य असा वटवृक्ष आहे. त्याच्या फांद्या तोडण्यात आल्या असून उर्वरित भाग संबंधितांकडून तोडला जाऊ नये अशी मागणी सभेमध्ये सदस्यांनी केली. रत्नागिरी शहरातील एका जुन्या गोरखचिंचेच्या वृक्षांचे जतन करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी पावले उचलली आहेत. त्याप्रमाणेच वडाच्या झाडांचे पर्यटनदृष्ट्या जनत करा अशी सुचना करण्यात आली आहे. याबाबत वन विभागाकडून संबंधितांना सुचना करण्याचे आश्वासन दिले गेले.