कुवारबाव येथे एटीएम फोडणाऱ्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

रत्नागिरी:- शहरालगतच्या कुवारबाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शुक्रवारी दोघांनाही न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. सुरज अमर मोटे (21, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) व गिरीराज भजनलाल गुर्जर (21, रा. बडेडा, जि. सवाई म्हादुपूर, राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे 2023 रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र, कुवारबाव शाखा येथील एटीएम फोडण्याची घटना समोर आली होती चोरट्यांनी धारदार हत्याराने एटीएम मशीन उचकटून एटीएम मशीनमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. पंरतु पैसे मिळाले नाहीत म्हणून एटीएम मशीनचा दरवाजा व मशीनवरील कॅमेरा फोडून नुकसान करुन पळ काढला मात्र चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या प्रकरणी बँकेचे शाखा मॅनेजर कैलास महादेव रहाडे (35, रा. राजेंद्रनगर, थिबा पॅलेस, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी न्यायालयाने चोरट्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.