रत्नागिरी:- कुवारबावला खेळाचे मैदान नसल्याने तिथे ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून मैदान बांधले. परंतु ते सरकारी जागेत व अनधिकृत असल्याचे सांगत प्रशासनाने ते बांधकाम तोडले. परंतु येथे असलेले भाजपाच्या झेंड्याचा अवमान केला आहे. ही कारवाईची मोहिम करणाऱ्यांवरच कारवाई केली जावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली.
कुवारबाव, कारवांचीवाडी, चंपक मैदान, साळवी स्टॉप, जे. के. फाईल्स आदी भागामध्येही अनेक बेकायदेशीर बांधकामे आहेत. परंतु प्रशासनाकडे तक्रारी देऊनही त्यावर कारवाई केली गेली नाही. परंतु कुवारबावमध्ये भाड्याने राहत असलेल्या व्यक्तीने तक्रार केल्यावर लगेच कारवाई केली जाते, असा अजब न्याय प्रशासन करत असल्याबद्दल राजेश सावंत आणि जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
चंपक मैदान येथे मोकाट गुरांसाठी जी शेड बांधली आहे, तीसुद्धा अनधिकृत असावी. कारण ही जागा स्टरलाईट कंपनीची असून अजून शासनाकडे वर्ग झालेली नाही. जर परवानगी घेतली असेल तर प्रशासनाने जाहीरपणे सांगावे. तसेच मैदान पाडण्यासाठी स्वतः तहसीलदारांना यावे लागले आणि भाजपाचे झेंडे असतानाही कारवाई करणाऱ्या उपस्थितांना आमच्या पद्धतीने जाब विचारू, असे सावंत यांनी ठणकावून सांगितले.
या पत्रकार परिषदेला दक्षिण रत्नागिरी तालुकाध्यक्ष दादा दळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, शहराध्यक्ष राजन फाळके, उत्तर रत्नागिरी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, दादा ढेकणे आदी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय कधीच परिपूर्ण नव्हते. कारण येते डॉक्टर्स टिकत नाहीत. डायलिसीससाठी फिल्टर एकाच रुग्णाला वापरायचा असतो. परंतु तो आपल्याकडे ३-४ रुग्णांना वापरला जात होता. याबाबत मी सूचना केल्यानंतर संबंधित डॉक्टर्सनी कार्यवाही केली. महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयासाठी दिली आहे. परंतु सध्या जिल्हा रुग्णालयात साथीचे रुग्ण असल्याने येथे रुग्णांना खाली झोपवले जाते याबाबत तुमची भूमिका काय याबाबत सावंत म्हणाले की, महिला रुग्णालयासमोर कर्मचारी वसाहतीची इमारत असून तेथे रुग्णांवर उपचार करण्याबाबतची सूचना जिल्हा शल्य चिकीत्सकांना देऊ.