रत्नागिरी:- तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कुवारबाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत आपल्या जीवनाचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गुरूवारी १३ मार्च रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अमित गणेश चव्हाण (वय २२, राहणार पूर्ण पत्ता मिळालेला नाही) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित चव्हाण हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एसवायबीएचे शिक्षण घेत होता. विद्यार्थ्यांना होळी सणाची सुट्टी असल्याने अमित चव्हाण हा बुधवारी रजा अर्ज देऊन वसतिगृहातून बाहेर पडला. घरी गेलेला अमित दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारच्या सुमारास पुन्हा वसतिगृहामध्ये आला. रूममध्ये आल्यावर त्याने रुमचा दरवाजा लावून घेत त्याने स्वतःला बंद करून घेतले होते. रूम बंद असल्याने इतर विद्यार्थ्यांनी दरवाजा ठोठावत त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र आतमध्ये असलेल्या अमितने कोणताही प्रतिसाद दिला नाही यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संशय बळावला. हा सर्व प्रकार गुरुवारी आठ वाजण्याच्या सुमारास घडला.
तत्काळ विद्यार्थ्यांनी घटनेची कल्पना येथील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर वसतिगृहाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. दरवाजा उघडताच अमित गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. यावेळी रूममध्ये बियरची बॉटल देखील सापडल्याचे समजते. परंतु अमितने इतकं टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील वस्तीगृहाच्या दिशेने धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.