कुवारबाव येथील मोबाईल शॉपी फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वेस्थानकानजिक कुवारबाव येथे पोलीस चौकीच्या समोर असलेल्या मँगोज  मोबाईल शॉपीच्या भिंतीला  भगदाड पाडून सुमारे ४ लाख ८७ हजार १९९ रुपये किंमतीचे मोबाईल, ब्लु टुथ , रोख रक्कम लांबविणार्या पश्चिम बंगाल मधील  हारुन मुबाकर हुसेन रशिद (२२), साहिल मोहसिन आलम  (२६, रा.पश्चिम बंगाल) दोघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोबाईलसह इतर साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे. पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपींना ताब्यात  घेतले आहे. तर त्यांचे अन्य साथीदारही लवकरच सापडण्याची शक्यता आहे.

कुवारबांव एसटी थांब्यासमोर स्नेहल साळवी यांनी सुमारे पंधरा दिवसांपुर्वी मँगोज मोबाईल शॉपी सुरु केली होती. दि.२६  फेब्रुवारी रोजी सकाळी  त्यांना मोबाईल शॉपीच्या भिंतीला भगदाड  पाडून अज्ञात चोरट्यांनी आतील मोबाईल लांबविले असल्याचे लक्षात आले . त्यांनतर अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर  गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 

शहर पोलीसांसमवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी या चोरट्यांच्या मागावर होते. शॉपीच्या भिंतीला ज्या प्रकारे  भगदाड पाडण्यात आले होते. त्यावरुन चोरटे या कामातील अनुभवी असल्याची शक्यता होती. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेने परिसरात सुरु असलेल्या बांधकामावर  असलेल्या कामगारांची चौकशी सुरु केली होती. पोलीस चौकीच्या बाजूला एका इमारतीचे काम सुरु आहे. तेथे प्लास्टर करण्यासाठी पश्चिम बंगाल येथील कामगार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यांनी तेथील १० ते १५ कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी   हारुन मुबाकर हुसेन रशिद (२२), साहिल मोहसिन आलम  या दोघांना पोलीसांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. दोघांच्या स्वतंत्र चौकशीत त्यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळयाने पोलीसांचा त्यांच्यावरील संशय अधिकच वाढला. अखेर पोलीसी स्टाईलने विचारल्यानंतर दोघांनी आपण चोरी केल्याची माहिती पोलीसांना दिली.

मोबाईल शॉपी समोर काम करत असताना नव्याने सुरु झालेल्या मोबाईल  शॉपीवर त्यांनी लक्षकेंद्रित  केले होते. त्यानंतर त्यांनी मोबाईल  शॉपी  फोडण्याचा  प्लॅन  तयार केला होता. त्यामध्ये त्यांना यशही आले. मात्र पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मोबाईल विकण्याचा त्यांचा प्रयत्न फसला.

दोघांनी चोरलेले मोबाईल सिमेंटच्या पोत्यात भरुन ठेवले होते. पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी लपवून ठेवलेले  सुमारे ४ लाख ७४ हजार १४९ रु.किंमतीचे सुमारे ३८ मोबाईल, ब्लु टुथ जप्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी पंचनामा करुन मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया करत होते.

पोलीस अधिक्षक डॉ .मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस  कर्मचारी सुभाष भागणे, मिलींद कदम, शांताराम झोरे, रमिज शेख, सागर साळवी,उत्तम सासवे,अमोल भोसले ,नितीन डोमणे, बाळू  पालकर यांनी हि कामगिरी केली.