कुवारबाव उत्कर्षनगर येथे बंद घर फोडून ३३ हजारांची चोरी

रत्नागिरी:- घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने घरातील टिव्हीसह दागिन्यांवर डल्ला मारला. रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबाव येथील उत्कर्षनगर, हनुमान सोसायटी येथे १५ जुलै ते १६ जुलै या कालावधीत ही घटना घडली. या चोरीत एकूण ३३ हजाराचा माल चोरीला गेला आहे.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी कापून आत प्रवेश करत ५ हजार रुपयांचा एलईडी टिव्ही, २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ हजार रुपयांची सोन्याची चेन, २ हजार रुपयांची सोन्याची अंगठी १ हजार रुपयांची चिल्लर असा एकूण ३३ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. रविवारी दुपारी फिर्यादी घरी आले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाची कडी कापलेली दिसून आली. त्यांनी घरात जाउन पाहिले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त स्थितीत पडलेले दिसून आले. आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.