रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुर्ली गावात भर वस्तीपासून अवघ्या २०० ते ३०० मिटर अंतरावर डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबटया अडकल्याने गावात खळबळ उडाली. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याचा सुमारास ही घटना घडली. वन विभागाने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याची फसकीतून सुटका केली.
कुर्ली गावातील समुद्रकिनारी असलेल्या डोंगराच्या पायथ्याजवळ झुडपात अज्ञात व्यक्तीनीं फासकी लावली होती याच डोंगरावर बिबटयाचा मुक्त संचार होता. आठ दिवसापूर्वी गावातील एक वासरु बिबट्याने फस्त केले होते तेव्हापासून कुर्लीसह पंचक्रोशीत बिबटयाची दहशत पसरली होती अशातच बुधवारी दुपारी ३ वाजल्यापासून बिबटया अडकलेल्या ठिकाणाजवळ श्वान मोठयाप्रमाणात भूंकत होते म्हणून काही ग्रामस्थ श्वान का भुंकत आहेत हे पाहण्यासाठी गेले असता त्यांंना बिबटया फासकीत अडकलेल्या स्थितीत आढळला.
या घटनेची माहिती शिवसेनेचे युवानेते आशुतोष तोडणकर यांनी परिक्षेत्रीय वनअधिकारी प्रियंका लगड यांना दिली. सायंकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास लगड आपल्या कर्मचार्यांसह पिंजरा घेऊन कुर्ली गावात दाखल झाल्या.
बिबटया ज्याठिकाणी अडकला होता तेथे पूर्णत: झाडी व बिबटया अडकलेल्या खालील भाग पूर्णत:निसरडा असल्याने बिबटया अडकलेल्या ठिकाणी सहज जाणे अशक्य होते.
सायंकाळी ६ वाजता प्रियंका लगड यांनी बिबटयाला वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरु केले स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबटया अडकलेल्या परिसरातील झाडी तोडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. घटनास्थळी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचा मदतीने पिंजरा घटनास्थळावर आणण्यात आला पंरतू बिबटया ज्याठिकाणी अडकला आहे तिथे पिंजरा घेऊन जाणे शक्य नसल्याने दोरखंडाच्या सहाय्याने वर घेऊन बिबटया असलेल्याठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत होते. अंधार पडल्याने बचावकार्यात अडथळा होत होता. वनविभागाने आणलेल्या मोठया ४ सर्च लाईटचा प्रकाशात ग्रामस्थांचा मदतीने बिबटयाचे बचावकार्य सुरु होते.