कुणबी समाजाचे नेते, माजी जिप सदस्य नंदकुमार मोहिते यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील बहुजन चळवळीचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे  एक निर्भिड फुले- शाहू- आंबेडकरी विचारवंत, कुळ कायदा जमिनींविषयी प्रश्नांचे गाढे अभ्यासक कुणबी समाजनेते नंदकुमार मोहिते यांच्या निधनाने जिल्हा हळहळला. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी त्यांना ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. राजकीय तसा विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी झोकून देणारा, एक शिक्षणमहर्षी हरपल्याची बातमी समाजमनाला चटका लावणारी ठरली.

रत्नागिरीतील कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते, एक ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार धोंडू मोहिते (वय 65, रा. शिवारआंबेरे) येथील समाजमनात एक आगळं- वेगळं व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित होते. ओबीसी, कुणबी समाजासाठी झटणारा एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर होती. जिल्ह्य़ातील कुळांच्या प्रश्नी त्यांनी प्रशासन, शासन यांच्याशी हिरहिरीने समाजचळवळीच्या माध्यामतून लढा उभारला, आंदोलने देखील केली. त्यासाठी सातत्याने सहकाऱ्यांसोबत पाठपुरावा केला. कुळ कायदा जमानीविषयी प्रश्नांचे ते गाढे अभ्यासक होते. त्यामाध्यमातून कुळांच्या प्रश्नी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू होती.  

   येथील ग्रामीण भागात गोरगरीब, सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांना त्याठिकाणी शिक्षण मिळावे यासाठी मोठय़ा जिद्दीने रत्नागिरी तालुक्यातील शिवारआंबेरे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात त्यांनी मोलाचे पाऊल उचलले. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. ग्रामीण भागात पदवीपर्यंतचे शिक्षण देऊ करणारा ते शिक्षणमहर्षी म्हणून ते ओळखले गेले.  

  सामाजिक आणि राजकीय चळवळीशी नंदकुमार मोहिते यांचा प्रवास सातत्याने सुरू होता. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या सामाजिक संघटनाच्या कार्यकारणीतही ते क्रियाशील होते. ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी त्यां सतत प्रशासन, शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. कुणबी, बहुजन समाजाचे काम करताना आपल्या समाजबांधवांना जोडत जोडत पुढे नेत. ओबीसी, बहुजन चळवळीचे एक तळागाळातील आधारस्तंभ बनले. सामाजिक संघटनातील बहुजन विकास आघाडी, संघटनाच्या माध्यमातून कुणबी, बहुजन समाजाला राजकीय पटलावर नेण्यातही त्यांची धडपड राहिली. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले होते.  

   बळीराज सेना पक्षाचे सरचिटणीस पदाची जबाबदारी देखील त्यांनी उत्तमरित्या हाताळली. समाजाच्या विविध प्रश्नांची जाण त्यांना होती. माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी मागील काळात काम केले होते. त्या पदावर निवडून आल्यानंतर पाच वर्ष त्यांनी विविध प्रश्नांवर सभागृहात वेळोवेळी आवाज उठवला होता. अशा अनेक सामाजिक, राजकीय पदांवर ते कार्यरत होते.  

   मोहितेंच्या यांच्या निधनाची बातमी गुरूवारी सकाळी जिल्ह्य़ात येउन धडकता सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. कुणबी समाजासाठी झटणारा एक लढवय्या नेता हरपला असे उद्गार कुणबी, बहुजन समाजाच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच व्यक्त केले. साधी राहणी, उच्च वारसरणी असे हे व्य़क्तीमत्व हरपल्याने सर्व समाजस्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.  

 नंदकुमार मोहिते यांया पश्चात पत्नी, 2 मुलगे, मुलगी, भाउ, बहिणी असा परिवार आहे. उद्या शुक्रवार 7 मार्च रोजी सकाळी 7.00 ते 9.00 वाजता अंतिम दर्शनासाठी श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालय शिवारआंबेरे येथील शिक्षण संकुलामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.00 ते 10.00 वाजता त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर राहत्या घरातून अंत्यविधीसाठी निघण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.