कुंभारखाणी बुद्रुक पाझर तलावामध्ये दोन सांबर सापडली मृतावस्थेत

संगमेश्‍वर:- तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील पाझर तालावामध्ये दोन सांबर मृतावस्थेत सापडली. त्यातील एका सांबराचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खाल्लेल्या स्थितीमधील होता तर दुसर्‍याचे शरीर पूर्णतः कुजून गेले होते. त्यांचा मृत्यू कोळशिंदे (रानकुत्री) यांच्या हल्ल्यात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

सांबर मृत झाल्याची माहिती मंगेश बबन सुर्वे यांनी दूरध्वनीद्वारे वनविभागाला दिली होती. त्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, वनपाल संगमेश्वर तौफिक मुल्ला, वनरक्षक आरवली आकाश कडूकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा दोन सांबर पाण्यावरती तरंगताना दिसले. याबाबत सरपंच गीता सुर्वे, उपसरपंच अनिल सुर्वे, माजी उपसरपंच दिलीप सुर्वे, पोलिसपाटील राकेश सुर्वे, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृत सांबर पाण्याबाहेर काढण्यात आले. एका सांबराचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खाल्लेला होता तर उर्वरित भाग पूर्णपणे कुजून त्यात कीडे पडलेले होते. दुसर्‍या सांबराचे शरीरही पूर्णपणे कुजलेले होते. त्यामध्ये किडे पडून दुर्गंधी पसरलेली होती. दोन्ही सांबराची पशुवैद्यकीय अधिकारी कदम यांनी पाहणी केली. दोनही माद्या असल्याचे त्यांनी सांगितले.

या तलावाच्या परिसरात कोळशिंदे, बिबट्या, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा वावर असल्याचे पाहणीमध्ये आढळून आले. परिस्थिती आणि सांबराच्या शरीराचा खाल्लेला भाग यावरून दोन्ही सांबराचा मृत्यू हा कोळशिंदे यांच्या हल्ल्यात झाला असावा, असे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक आकाश कडूकर करत आहेत.