रत्नागिरी:- पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत लाभ घेतलेल्या काही कर दाते शेतकर्यांकडून जिल्हाप्रशासन बिनधास्त वसूली करत आहे. ती थांबवण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकारांना दिली.
रत्नागिरी बोलताना आमदार लाड म्हणाले, किसान सन्मानचा लाभ घेतलेल्यांमध्ये काही शेतकरी करदाते तर काही विविध कारणांनी अपात्र ठरलेले आहेत. त्या शेतकर्यांकडून दादागिरी करत वसुली होत आहे. ही बाब गंभीर असून आजच्या स्थितीत शेतकर्यांकडून अशा प्रकारे वसुली करणे योग्य नाही. अधिकार्यांची दादागिरी आम्ही सहन करुन घेणार नाही. हा मुद्दा लक्षात आणल्यानंतर वसुली स्थगित करु असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले. परजिल्ह्यातून रत्नागिरीत मोठ्याप्रमाणात भाजी येते. स्थानिक पातळीवर शेतकर्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली तर घरातच रोजगार मिळू शकेल. यासाठी भाजप लक्ष घालणार आहे. जिल्ह्यातील कृषी सेवकांनी त्या-त्या गावात जाऊन कोणते पिक घेता येईल याचा सर्व्हे केला पाहीजे. त्याचा अहवाल घेऊन जिल्हाप्रशासनाकडून त्यावर कार्यवाही झाली पाहीजे. भाजीपाला लागवडीला चालना दिली तर रत्नागिरीतील युवकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवणे शक्य आहे. या सर्व्हेसाठी 15 दिवसाचा कालावधी प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, राजकारण खुलेआम करावे. ते निवडणुकीपुर्ते मर्यादीत असले पाहीजे. सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आत्मसात केले पाहीजे. मात्र रत्नागिरीत तशी परिस्थिती नाही. स्थानिक मंत्री चुकीच्या पध्दतीने राजकारण करत आहेत. त्यातून सामान्यांना फटका बसतो. पदावर विराजमान होताच तिथे राजकीय दृष्टीकोन वापरु नये, असा सल्ला माजी मंत्री भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवी चव्हाण यांनी स्थानिक मंत्री उदय सामंत यांना दिला.