किरकोळ भांडणातून थेट मंत्र्यांच्या पीएला फोन; जिल्हा रुग्णालयात ज्युनियर क्लार्कचा तमाशा

रत्नागिरी:- ‘अरे तू मला काय सांगतोस…, मी पण मराठवाड्याचा आहे…’ असे सांगत जिल्हा रूग्णालयातील अधिक्षकाला धमकावत एका मंत्र्याच्या पीएला फोन करायला लावून रूग्णालयात धिंगाणा घालणार्‍या ज्युनिअर क्लार्कचा तमाशा पाहण्यासाठी सिव्हील सर्जन केबिननजीक तोबा गर्दी झाली होती.

रत्नागिरीचे जिल्हा शासकीय रूग्णालय या ना त्या कारणावरून चांगलेच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून रूग्णालयात रस्सीखेच सुरू झाली. तू तू मै मै करीत करीत बदलीनाट्य घडले आणि त्या वादावर पडदा पडला होता. आता मात्र जिल्हा रूग्णालयात नवा वाद, नवे नाट्य रंगले आहे. कर्मचार्‍यांमध्येच आता तू तू मै मै सुरू झाली असून थेट आव्हान देण्याचे प्रकार जिल्हा रूग्णालयात राजरोस घडत आहेत.

जिल्हा रूग्णालयात बीडवरून आलेला एक कर्मचारी बॉसिंगगिरी करण्याचा प्रकार करीत आहे. हा कर्मचारी ज्युनिअर क्लार्क असून एका वादग्रस्त मंत्र्यांच्या नावाखाली सार्‍यांनाच वेठीला धरण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक यांना कर्मचार्‍यांना नियुक्ती देण्याचे अधिकार आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या परवानगीनुसार डॉक्टर, कर्मचारी यांच्या नेमणूका अधीक्षक करतात. त्यानुसार ज्या ठिकाणी काम कमी आहे आणि जादा कर्मचारी आहेत त्या ठिकाणचे कर्मचारी कमी करून जिल्हा रूग्णालयात कामगिरीवर या कर्मचार्‍यांना आणण्यात आले आहे.

हा प्रकार कदाचित बॉसिंगगिरी करणार्‍या ज्युनिअर क्लार्कला खपला नाही. ज्यांना कामगिरीवर या ठिकाणी आणले हे सर्व कर्मचारी स्थानिक आहेत आणि स्थानिक कर्मचार्‍यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम या परजिल्ह्यातील कर्मचार्‍याने राबविला आहे. या डॉक्टरला इथे का नियुक्ती दिली? त्या कर्मचार्‍याला तिकडे का नियुक्ती केली असे सवाल आपल्या वरिष्ठांना करून वरिष्ठांशीच वाद घालण्याचा प्रकार या कर्मचार्‍याने केला.

या कर्मचार्‍याचे यापूर्वीचे प्रतापदेखील आता बाहेर काढण्यासाठी रूग्णालयातील कर्मचारी एकवटले आहेत. गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या केबिनशेजारी असलेल्या अधिक्षकांच्या केबिनमध्ये ‘मी मराठवाड्याचा आहे’ अशी ओरड मारून त्या ज्युनिअर क्लार्कने अक्षरशः धिंगाणा घातला.