चिपळूण:- किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना काल गुरुवारी चिपळूण तालुक्यातील खेर्डी कातळवाडी येथे घडली. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 10 जणांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या
बाबतची फिर्याद विकास सुरेश दाते यांनी पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार मधुकर दाते, सुधाकर दाते, अभिनाथ दाते, मिनाक्षी दाते (सर्व रा. खेर्डी कातळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास दाते यांनी फिर्यादीत म्हटले आहे, आपल्या गोठ्यातील गाय टेरव येथील कदम यांना देऊन ती घेऊन जात असताना सामाईक जागेत मधूकर दाते यांनी लाकडाची बेडे लावलेले होते. ते विकास दाते यांच्या वडीलांनी बाजूला केले. हे बेडे बाजूला करताना मधुकर दाते यांनी पाहीले व त्यांनी विकास यांना आमच्या बेड्याला कोणाला विचारुन हात लावला असे म्हणत हातात काठी घेऊन विकास यांचे वडील व त्यांचा भाऊ यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ करू लागले. त्या भांडणाचा आवाज ऐकून विकास दाते यांची वहीणी व आई त्या ठिकाणी आल्या असता बेडे लावण्याची काय गरज आहे अशी विचारणा केली. याचा राग मनात धरून मधुकर दाते यांनी विकास यांना काठीने मारहाण केली. त्यांच्यासह सुधाकर, अभिनाथ व मिनाक्षी दाते या चौघांनी शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली व काठीने मारहाण केली. तसेच सुधाकर यांनी विकास यांच्या डोक्यात काठी मारून दुसरा फटका उजव्या डोळ्याच्या वरील बाजूस कपाळावर बसला आहे. तसेच दगड भीरकावून मारल्याने विकास जखमी झाले आहेत. अशी तक्रार दाखल केली आहे.
तर
दुसऱ्या बाजूने सुधाकर रामा दाते यांनी फिर्याद दिली आहे. सुधाकर यांच्या राहत्या घरात असलेले लाकडी बेडे सुरेश दाते यांनी काढून फेकून दिले. हा प्रकार सुधाकर यांचा भाऊ मधुकर यांनी पाहीले व हा बेडे काढून का फेकून दिले अशी विचारणा सुरेश दाते यांना केली असता याचा राग मनात धरून मधुकर यांना धक्काबुक्की केली. यावेळी सुधाकर दाते हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता विकास, विपुल व मनोज दाते या तिघानी सुधाकर दाते यांना लाकडी दांडक्यानी मारहाण केली. तसेच या तिघांसह वैभवी, सरस्वती, सुरेश यांनी देखील सुधाकर व मधुकर यांना परत आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली. अशी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल करून 10 जणांवर कारवाई केली आहे.