किमान वीज बिल वसुलीच्या महावितरण अधिकाऱ्यांना सक्त सूचना

रत्नागिरी:- वितरित केलेल्या विजेच्या किमतीचा परतावा वेळेत मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणपुढील अडचणी आणखी वाढत आहेत. थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान समोर असताना महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात नोव्हेंबर महिन्याचे चालू वीजबिलही पूर्ण वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे वसुलीच्या कामाला गती देऊन किमान वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सक्त निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) प्रसाद रेशमे यांनी दिले आहेत.

कोकण प्रादेशिक विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता व त्याअंतर्गत पेण, ठाणे, वाशी, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंता यांच्या समवेत कल्याण परिमंडल कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. महावितरणच्या एकूण महसुलात 40 टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणार्‍या कोकण प्रादेशिक विभागाच्या वसुलीत दरमहा राहणारी तफावत महावितरणच्या बिकट आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारी ठरत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून वसुलीच्या कामाला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केले तर आणि तरच महावितरण टिकू शकणार असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे यांनी स्पष्ट केले. कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून नोव्हेंबर-2021 या महिन्यात चालू वीजबिलाचे 3 हजार 107 कोटी रुपये वसूल होणे आवश्यक होते. मात्र चालू वीजबिलाच्या वसुलीत तब्बल 590 कोटी रुपयांची तूट आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या निर्धारित उद्दिष्टापेक्षा ही वसुली 1 हजार 336 कोटी रुपयाने कमी आहे.
कोकण प्रादेशिक विभागात एकूण थकबाकी व नोव्हेंबरचे चालू वीजबिल लक्षात घेता कृषिपंप ग्राहक वगळता वितरित केलेल्या विजेची वसुली योग्य रक्कम 5 हजार 734 कोटी रुपये आहे. तर कृषिपंप ग्राहकांकडून सप्टेंबर 2020 पासूनचे 1 हजार 672 कोटी रुपये चालू वीजबिल आणि कृषी धोरण-2020 योजनेंतर्गत 50 टक्के सवलतीशिवाय 4 हजार 404 कोटी रुपयांची थकबाकी वसुली अपेक्षित होती. परंतु, चालू वीजबिलाचे 65 कोटी व योजना सुरु झाल्यापासून थकबाकीतील अवघे 198 कोटी रुपये वसूल होऊ शकले. वसुलीची ही बिकट परिस्थिती पाहता मुख्य कार्यालयाकडून दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणार्‍या यादीतील ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश देतानाच सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी बारकाईने लक्ष देऊन नियमानुसार व वेळेत हे काम पूर्ण करण्यासोबत या कामांची पडताळणी करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे यांनी दिले आहेत.