किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

रत्नागिरी:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तोक्ते’ वादळ आज रविवारी दुपारी रत्नागिरी जिल्ह्याच्या किनार्‍यावर धडकू शकेल असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवान वार्‍यांसह अतिवृष्टी सुरु झाली आहे. या वादळाची चाहूल काल शनिवारी लागली असून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. किनारी भागात वारेही वाहत असून समुद्र खवळला आहे.

लक्षद्वीप बेटांजवळ शुक्रवारी तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. त्याची तीव्रता वाढून शनिवारी त्याचा तडाखा केरळ किनारपट्टीला बसला. हे वादळ हळूहळ पुढे सरकत आहे. या वादळाचा प्रभाव उद्यापर्यंत महाराष्ट्रच्या किनारपट्टीला जाणवणार आहे. याची तिव्रता रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या किनार्‍यांना जाणवणार आहे. शनिवारी त्याचा प्रभाव दिसत असून किनारी भागातील वार्‍याचा वेग वाढलेला आहे. समुद्राच्या लाटांनी किनारे गाठले आहेत. त्यामुळे वातावरण बदलले असून नागरिकही सतर्क झाले आहेत. तोक्ते चक्रीवादळ किनारपट्टीपासून खोल समुद्रात साडेतीनशे किलोमीटर अंतरावरुन जाणार आहे. तोक्ते चक्रीवादळाची चाहूल शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून आली आहे. रत्नागिरी शहरासह तालुक्यात कुरतडे, तोणदे, पावस, गणपतीपुळे परिसरात वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. तोणदेमध्ये तर अर्धा तास वार्‍याचे तांडव सुरु होते. कुरतडे येथील भास्कर कुरतडकर यांच्या बागेतील आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. हा पाऊस अर्धा तास सुरु होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी विजप्रवाह खंडित करण्यात आला होता. तासाभरानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होती. चिपळुण शहर परिसरासह गुहागर, राजापूर, लांजा, संगमेश्‍वरमध्ये काही ठिकाणी सायंकाळी मोठ्या सरींसह पाऊस झाला. दापोली तालुक्यातील हर्णे येथील किनारी भागातील काही लोकांना वादळा धोका लक्षात घेउन स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सायंकाळी उशिरा सुरु झाल्या होत्या. वादळाच्या तिव्रतेमुळे केरळ, कर्नाटक येथील मच्छीमारांनी जयगड, काळबादेवीसह सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. रत्नागिरी तालुक्यात सुमारे 90 हून अधिक नौकांनी आश्रय घेतल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, वादळ कर्नाटकडून येत असून पहिला फटका समुद्र किनारी भागातील रत्नागिरी तालुक्यातील पावस, पुर्णगड, गावखडी गावांना बसू शकतो. तालुक्यात 206 गावांपैकी 104 गावे किनार्‍यावर आहेत. स्थानिक तरुणांच्या सहकार्याने प्रत्येक गावात पाच मदत पथके तयार केली आहेत. रस्ते सफाई, आरोग्य व्यवस्था, लोकांना आवश्यक गरजा पुरवणे आणि रेस्क्यु पथक यांचा त्यात समावेश आहे. जेसीबी, बुलडोझर यासारखी यंत्रणाही सज ठेवण्यात आल्याचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सांगितले.