कासारवेली वळणावरील रस्त्याचे काम आठ दिवसात न केल्यास उपोषण करत रस्ता रोको

माजी सरपंच जितेंद्र जोशी यांचा निवेदनाद्वारे इशारा

रत्नागिरी:- रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील कासारवेलीनजिक सावित्री वड बस स्टॉप येथील रस्त्याचे काम बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे वर्षभरापासून रखडले आहे. रस्त्यावर केवळ खडी टाकून ठेवण्यात आल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असून पुढील आठ दिवसात या मार्गाचे काम पूर्णत्वास न गेल्यास उपोषण छेडण्यासह या मार्गावरील वाहतूक रोखून धरू असा इशारा येथील माजी सरपंच जितेंद्र जोशी यांनी दिला आहे.

मागील वर्षभरापूर्वी बांधकाम विभागाकडून कासारवेली येथील सावित्री बड बस स्टॉप येथील वळणाजवळील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. आजतागायत या रस्त्यावर केवळ खडी पसरवून एक मार्ग पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यापासून या मार्गावर दोन चाकी व तीन चाकी वाहनांचे अपघात होऊन ग्रामस्थ जखमी झाले आहेत. विशेष करुन दोन चाकी वाहनधारक खडीवरुन घसरुन जखमी होत आहेत.

या मार्गावरुन अनेक वाहनधारक रत्नागिरी ते गणपतीपुळे आणि जयगड असा प्रवास करत असतात. सुट्टयांच्या कालावधीमध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटक याच सागरी मार्गाचा वापर करतात. याआधी देखील आपल्याकडे या संबंधी ग्रामस्थांकडून निवेदन दिलेले होते. त्यासंबंधी कोणती कारवाई करण्यात आली हे आपल्या खात्याकडून कळविण्यात आलेले नाही. तरी या मार्गावर या पुढे जर अपघात होऊन जीवीतहानी झाल्यास आपले बांधकाम खाते सर्वस्वी जबाबदार असेल. काळबादेवी गावचा माजी सरपंच आणि ग्रामस्थांचे पत्र आपल्या कार्यालयात प्राप्त होताच ८ दिवसात रस्त्यांचे काम सुरु न झाल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ याच मार्गावर दिनांक ५ जानेवारी पासून उपोषणास बसतील तसेच मार्ग देखील रोखून धरतील. यानंतर होणाऱ्या परिणामास आपले बांधकाम खाते जबाबदार असेल तरी आपण या पत्राची दखल घेवून उचित कारवाई करावी अशी मागणी जितेंद्र जोशी यांनी केली आहे.