काळवीटाच्या शिंगांसह पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पोलीस ठाणे व गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या कारवाईत मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील हॉटेल शिवप्रसादच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर काळवीटाची शिंगे पोलीस पथकाने ताब्यात घेतली. ही कारवाई ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी

संशयीत शामराव धोंडीराम देवकर, वय ५०, राहणार इंद्रानगर झोपडपट्टी वैरागी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेतले.

पंचासमक्ष केलेल्या तपासणीत १६ इंच लांबीचे १ शिंग, १५.५ इंच लांबीची २ शिंगे, १५.०० इंच लांबीचे १ शिंग, १४.०५ लांबीची २ शिंगे, वाकडी तिकडी गोलकार पुढे निमुळती व टोकदार असलेली अशी शिंगे आढळून आली. याची खात्री करुन पोलिसांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

संशयीत व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम सावंत करित आहेत.