रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथे क्रिकेट मॅचमध्ये बॅटिंग करायला दिली नाही याचा राग मनात धरुन तरुणाला शिवीगाळ करत बॅटने मारहाण केली. ही घटना रविवार 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वा.घडली.
सुमित सुधीर भोळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात साई रविंद्र बनप याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, यातील फिर्यादी आणि संशयित हे दोघेही एकाच गावात राहणारे असून एकमेकांचे मित्र आहेत. हे दोघेही एकत्र क्रिकेट खेळ खेळत असतात. रविवारी सायंकाळी ते पाथरदेव ग्राउंड काळबादेवी येथे क्रिकेटची प्रॅक्टिस करत असताना संशयित सुमित भोळेने त्याला सड्ये येथे झालेल्या मॅचमध्ये बॅटिंग दिली नाही याचा राग मनता धरुन साई बनपला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हातातील लाकडी बॅटने मारहाण करुन त्याला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या डाव्या कानाच्या खाली, मानेजवळ व डाव्या दंडावर मारुन मुकामार व दुखापत करुन भेटशील तिथे मारीन अशी धमकी दिली. याप्रकरणी संशयिताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.