रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील काळबादेवी-मिर्या (ता. रत्नागिरी) येथील खाडीवर पूल उभारण्यासाठी दुसर्या टप्प्यातील माती परिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात किनारी भागात केलेल्या परिक्षणाचा अहवाल सकारात्मक आला आहे. खाडीतील पाण्यामध्ये तिन ठिकाणी माती परिक्षण केले जाणार असून त्याचे काम महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमएसआरडीसी) डीबीएम कंपनीला दिले आहे. हे काम वीस दिवस सुरु राहणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुलाची निविदा प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
कोकणाला लाभलेल्या समुद्र किनार्यावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने एमएसआरडीसीच्या माध्यमातून रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग बनविण्याचा निर्णय घेतला आहे. जयगड ते पावस या टप्प्यात काळबादेवी आणि भाट्ये खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात काळबादेवी-मिर्या या दोन गावांमधील खाडीवर पूल उभारण्यासाठी पावसाळ्यापुर्वी मे 2024 मध्ये दोन ठिकाणी माती परिक्षण केले होते. त्यामध्ये खाडीपासून दोनशे मिटर अंतरावर मिर्या आणि काळबादेवी गावातील मातीचे नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या ठिकाणी पिलर उभारण्यास आवश्यक जागा असल्याचा अहवालही प्राप्त झाला आहे. दुसर्या टप्प्यात खाडीतील पाण्यामध्ये उभारण्यात येणार्या पिलरसाठी तिन ठिकाणी माती परिक्षक केले जात आहे. दहा दिवसांपुर्वी हे काम सुरु झाले आहे. पाण्यात बोअरवेल पाडण्यात येत आहेत. हे काम अजून वीस दिवस सुरु राहणार असल्याचे एजन्सीच्या ठेकेदाराकडून सांगण्यात आले. हे नमुने मुंबईत पाठविण्यात येणार आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. याठिकाणी सुमारे सात ते आठ पिलर उभारले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, सागरी किनार्यावरील काही भागांमध्ये चांगले रस्ते आहेत. त्यांचे रुंदीकरण करणे, काही ठिकाणी चौपदरीकरण तर खाडींवर पूल उभारावे लागणार आहेत. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून या रस्त्यासाठी दहा हजार कोटींची तरतूदही केली आहे.