कार्यकर्त्यांमधील वाद मिटले तरच जिल्ह्यात महायुतीची ताकद दिसेल: ना. सामंत

महायुतीचा संयुक्त जिल्हा कार्यकर्ता मेळावा हजारोंच्या उपस्थितीत रत्नागिरीत संपन्न

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी -शिवसेना – भाजपा आणि इतर घटक पक्षाच्या महायुतीच्या समन्वयक यांच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तीन पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांचा कार्यकर्ता मेळावा हजारोच्या उपस्थित रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अनेकदा आपण आपसापसात भांडत बसतो मात्र जर आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचा असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत त्यासाठी आपला नेमका शत्रू कोण आहे हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी रत्नागिरी महायुतीची जय्यत तयारी आपण सर्वांनी मिळून करूया असे सूचक उद्गार राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात काढले.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी रत्नागिरी महायुतीचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते यांची एकजूटीने काम करा. या देशात मोदींना पंतप्रधान करण्यापासून कोणतीच ताकद रोकू शकत नसल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा होण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करा असे आदेश या बैठकीत उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असून महायुतीच्या पदाधिकारी यांनी समन्वय ठेवा खालचे कार्यकर्ते आपोआप समन्वय ठेवतील असा सल्ला उपस्थित पदाधिकारी यांना उदय सामंत यांनी दिला.
आजच्या जमलेल्या कार्यकर्त्यांनी महायुतीची जिल्ह्यातील ताकद दाखवून दिली. हीच ताकद येणारी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ते ग्रामपंचायत पर्यत वापरून रत्नागिरी जिल्हा महायुतीमय केल्या शिवाय राहणार नसल्याचा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. महायुतीचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही यांची जबाबदारी तुमचा पालक म्हणून मी घेतल्याचा शब्द यावेळी मंत्री सामंत यांनी दिला. सगळ्यांनी एक संघपणे राहून काम करण्याचे आहवान करत आपल्या मिशनच्या दिशेने पाहून रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून महायुतीचा उमेदवार निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करू या असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित पदाधिकारी यांना केले.

यावेळी राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी- रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते -समन्वयक सदानंद चव्हाण, माजी आमदार भाजपाचे समन्वयक प्रमोद जठार, आमदार राष्ट्रवादीचे समन्वयक शेखर निकम, आमदार योगेश कदम, किरण उर्फ भैय्या सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष केदार साठे, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, पूजाताई निकम, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष साधना बोथरे, शिवसेना महिलाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, जयंद्रत खताते, सिकंदर जसनाईक, जाकीर शेकासन, बाप्पा सावंत, सुरेखा खेराडे, उल्का विश्वासराव, सर्व तालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.