अत्याधुनिक माशीनरीची खरेदी, जेवणाची दगदग दूर
रत्नागिरी:- जिल्हा विशेष कारागृहातील कच्च्या आणि पक्क्या कैद्यांच्या ताटात आता रेडिमेंट (तयार) आणि एका आकाराच्या एकसारख्या चपात्या मिळत आहेत. ही किमया आहे, ऑटोमॅटिक चपाती बनवण्याच्या यंत्राची. या पाच लाखाच्या मशिनमधून तासाला हजार चपात्या तयार होऊन बाहेर पडतात. तसेच ५० किलो तांदुळ शिजतील, एवढा मोठा कुकरही कारागृह प्रशासनाने खरेदी केला आहे. त्यामुळे कारागृहाच्या स्वयंपाकघारातील मनुष्यबळ कमी लागत असून गॅस सिलिंडची मोठी बचत होत आहे. कोणावर अवलंबुन राहावे लागत नसून कैद्यांना दर्जेदार जेवण मिळत आहे.
जिल्हा विशेष कारागृहातील स्वयंपाकघर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर लग्न समारंभातील जेवणावळीमधील लगबघ, धावपळ, गोंधळ या प्रमाणेच म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. कारण एका वेळेला या कारागृहामध्ये सुमारे १८० कैद्यांसाठी जेवण तयार करावे लागते. त्यासाठी स्वयंपाकघरात १० ते १५ कैदी राबत असतात. त्यापैकी सात ते आठ कैदी हे चपात्या बनवण्यासाठी लागत होते. पिठ मळणारे, गोळे करणारे आणि त्यानंतर ती चपाती भाजणे यासा सारा खटाटोप होता. परंतु जिल्हा विशेष कारागृहाने त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे चपाती बनविणाऱ्या मशीनसाठी निधीची मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाने तत्काळ त्यासाठी ५ लाखाचा निधी दिला आणि ऑटोमॅटिक चपाती मेकिंग मशीन खरेदी करण्यात आले. विशेष म्हणजे पिठ मळण्यापासून गोळे तयार करण्याचे काम मशिन करते. त्यानंतर ते गोळे एका मनुष्याद्वारे मशीनमध्ये ठेवल्यास एका आकाराची लाटलेली चपाती भाजून दुसऱ्या बाजूने टमटमीत फुगुन बाहेर पडते. सकाळी ८०० आणि रात्रीच्या जेवणाला ८०० चपात्या तयार करण्यात येतात. विशेष म्हणजे अवघा एक कैदी हे सर्व करतो. त्यामुळे येथे मनुष्यबळ आणि वेळ वाचतो.
कारागृह प्रशासनाने ५० किलो तांदुळ शिजती एवढा मोठा कुकर घेतला आहे. पुर्वी मोठ्या टोपामध्ये भात शिजवला जात होता. त्यासाठी जास्त गॅस लागत होता. आता वाफेवर आणि लवकर भात शिजतो. पेज काढण्याची व्यवस्था देखील या कुकरला आहे. त्यामुळे एकुणच स्वयंपाक घरामध्ये कैद्याचे लागणारे मनुष्यबळ कमी झाले आहे. गॅस सिलिंडर आणि वेळेची बचत होऊन दर्जेदार जेवण कैद्यांना मिळत आहे.