रत्नागिरी:-कारवांचीवाडी येथील एका दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्या प्रकरणातील तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हा लुटीचा प्रकार झाला. तसेच या गुन्ह्यातील संशयितांनी चोरलेल्या रत्नागिरी पासिंगच्या गाडीमुळे राजस्थान आणि गुजरातमधील गंभीर गुन्हे उघडकीस आले. या सराईत गुन्हेगारांनी शेकडो तोळे सोने, काही किलो चांदीच्या आणि 3 रिव्हॉल्व्हर चोरल्याचे उघड झाले. त्यापैकी एक रिव्हॉल्व्हर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुजरात येथून जप्त केली असून दोघांना अटक केली आहे.
भेराराम ओखाजी सुन्देशा (38, रा. खेडशी) यांनी याबाबत तक्रार दिली होती. रत्नागिरी-कोल्हापूर या मुख्य मार्गावर कारवांचीवाडी गेल्या महिन्यात हा गुन्हा घडला होता. खेडशी महालक्ष्मी मंदिर या भागातील महालक्ष्मी ट्रेडर्स दुकानासमोर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी येऊन थांबली. गाडीतून तिघे उतरले आणि त्यांनी दुकानमालकाला धमकावले. त्यानंतर एकाने शस्त्राचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. त्या वेळी दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे 14 हजार रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी, मोबाईल आणि सीसीटीव्हीचा ड्राईव्ह घेऊन चोरटे पसार झाले. पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग आणि ग्रामीण पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश साळुंखे, हवालदार, कांबळे, राजवैद्य, गायकवाड यांच्या पथकाने गुजरातमधून दोघांना ताब्यात घेतले. किशोर परमार (रा. मुळचा तळेरे-कणकवली, सध्या राजस्थान) आणि अणदाराम चौधरी (रा. मुुळचा बेळगाव, सध्या राजस्थान) यांना अटक केली; मात्र या प्रकरणातील अन्य साथीदार फरार होते. हा सर्व प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचे उघड झाले. रत्नागिरीतील या दुकानदाराला अडचणीत आणण्यासाठी रचलेला हा कट होता.
गुन्हेगारांनी प्रकरणी एक चारचाकी गाडी चोरली होती. त्या गाडीचा वापर करीत त्यांनी गुजरात, राजस्थानमध्येही चोर्या केल्या. गुजरात येथील चेकपोस्टवर रत्नागिरी जिल्ह्याचे पासिंग असलेली गाडी अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा पोलिसांना गाडीमध्ये चोरीला गेलेली काही किलो चांदी आणि एक रिव्हॉल्व्हर सापडले. या प्रकरणी गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. किशोर राम कालुरराम जाट (वय 23, रा. मालावासा थांना, पिपाड सिटी जि. जोधपूर, राजस्थान) आणि विजय मोहनलाल मेघवाल (वय 25, रा. चण्डावल, जि. पाली, राजस्थान) अशी त्या दोन संशयितांची नावे असून त्यांना दिवेर पोलिस स्टेशन (राज्यस्थान) येथून अटक करण्यात आली. त्यांनी यापूर्वी राजस्थानमध्ये काही तोळे सोन्याची चोरी केल्याचेही उघड झाले.
ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुजरात पोलिसांच्या ताब्यातील किशोर जात आणि विजय मेगवाल यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर ग्रामीण पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी दुसरे पथक पुन्हा चौकशीसाठी राजस्थानला जाणार असल्याचे समजते. ग्रामीण पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी त्यांच्या टीमचे या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले असून त्यांना बक्षीस जाहीर केले.