कामगार कल्याण मंडळातच रखडली कामगारांची नोंदणी

योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी; माहिती देण्यासही टाळाटाळ

रत्नागिरी:- सरकारी काम आणि सहा महिने थांब, या म्हणीची प्रचिती आता कामगार कल्याण मंडळात आली आहे. चार-चार महिने झाले तरी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगारांची नोंदणी प्रलंबित आहे. सुमारे १०० कामगारांची नोंदणी रखडली आहे. अधिकाऱ्यांना वेळच मिळत नसल्याने नोंदणीवर परिणाम होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कामगारांचे कल्याण करणारे मंडळ आहे ही त्यांना अडचण आणणारे मंडळ, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शासनाने विविध योजना राबवताना इमारत व इतर कामगारांसाठीदेखील योजना अंमलात आणल्या आहेत. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंदणी शासनाने दिलेल्या पोर्टलवर होणे गरजेचे आहे. शासनाने जे पोर्टल दिले आहे त्या पोर्टलवर अनेकांनी ऑनलाइन नोंदणी केली; मात्र ऑनलाइन आलेले प्रस्ताव मंजूर करण्यासाठी या मंडळाच्या अधिकाऱ्यांना वेळच नसल्याची बाब आता पुढे आली आहे. रत्नागिरीतील काही कामगारांना त्याचा फटका बसला आहे. कामगारांनी नोंदणी केल्यानंतर ४ महिने झाले तरी आपल्या ऑनलाइन अर्जाचे काय झाले याची माहिती संबंधित कामगारांना मिळत नाही. यातील काही कामगारांनी थेट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्यालय गाठले. त्या वेळी तेथील कर्मचारी कामगारांना उडवाउडवीची उत्तरे देतात. काही अधिकारी तुमचे अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पोर्टलवर प्रलंबित असल्याचे उत्तर देत आहेत.

वरिष्ठ अधिकारी वेळीच आलेल्या प्रकरणांचा निपटारा करत नसल्याने अनेक कामगारांचे प्रस्ताव आजही प्रलंबित आहेत. संबंधित पोर्टलवर कामगारांची वेळीच नोंदणी न झाल्याने शासनाकडून मिळणारे लाभ त्या कामगारांना आजतागायत मिळू शकले नाहीत. तर उशिराने दाखल झालेले अर्ज काही अधिकाऱ्यांनी मंजूर केल्याच्या तक्रारी आता होऊ लागल्या आहेत. लग्नासह प्रसुतीसाठी मिळणाऱ्या आर्थिक साहाय्यासाठी कामगारांना कार्यालयात जाऊन लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीचे तसेच प्रसूती झाल्यावर आपल्या अपत्याची नावनोंदणी करावी लागते. नावाची नोंदणी करून देखील त्याच्या मंजुरीसाठी ४ ते ५ महिन्यांचा कालावधी लागत असल्याने शासनाचे लाभ नेमके मिळणार तरी कधी? असा प्रश्न आता कामगार वर्गातून होऊ लागला आहे.