रत्नागिरी:- कोर्लेखिंड (ता. लांजा) येथील क्रशरच्या ठिकाणी मुकादमाने पाच मिनीटे उशिरा कामावर आलेल्या कामगाराला घाणेरड्या शिव्या घालून त्याच्या डोक्यात लोखंडी फावडे मारुन गंभीर जखमी केले. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
विलास काशीनाथ राठोड (वय २५, मुळ ः रा. विजापूर, कर्नाटक, सध्या कोर्लेखिंड, लांजा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ३० एप्रिल २०२० दुपारी अडीचच्या सुमारास कोर्लेखिंड, लांजा येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नवनाथ धुलाप्पा पवार (वय ३३, रा. कोर्लेखिंड, ता. लांजा) व संशयित हे कोर्लेखिंड येथील शरद दत्ताराम लाखण (रा. भांबेड, ता. लांजा) यांच्या क्रशरसाठी काढण्यात येणाऱ्या काळ्या दगडाच्या खाणीवर मजुरीच्या कामाला होते. फिर्यादी नवनाथ पवार यांच्यासह इतरही गावातील लोकही कामाला होते.
फिर्यादी व आरोपी विलास हा काळ्या दगडाचे खाणीवर ट्रॅक्टरमध्ये उत्खनन केलेले दगड भरण्याचे काम करत असे व क्रशरच्या बाजूला झोपडी बांधून रहात होते. आरोपी हा तेथील कामगारांवर देखरेख ठेवण्यासाठी मुकादम म्हणून होता. तो फिर्यादी यांच्या सोबतचे कामगारांना ट्रॅक्टरमध्ये भरलेले दगड स्वतःचे ट्रॅक्टरमधून वाहून नेण्याचे काम करत असे. मात्र फिर्यादी हे दुपारच्या जेवणाचे सुट्टी नंतर पाच मिनीटे उशिरा कामाला आले म्हणून आरोपी मुकादम विलास राठोड याने आई वरुन अश्लील शिवीगाळ करुन तुला ठार मारुन टाकतो असे बोलून काळ्या दगडाचे ढिगाऱ्यावर असलेले लोखंडी फावडे घेवून फिर्यादी नवनाथ पवार यांच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली. तसेच त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी नवनाथ पवार यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी राठोड यांच्याविरुद्ध भादवी कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास लांजा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय चौधर करत होते. तपासात पोलिसांनी आरोपीला अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याचा निकाल मंगळवारी (ता. २४) प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुनिल गोसावी यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी आठ साक्षिदार तपासले. मंगळवारी न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारवासाची शिक्षा ठोठावली.