कामगारांचे लाखो रुपये घेऊन फरार तिघे गुजरामध्ये जेरबंद

2 वर्षे होते फरार, कामगारांवर आली होती उपासमारीची वेळ

रत्नागिरी:- कामगार पुरवण्याचा ठेका असलेल्या 3 ठेकेदारांनी 40 कामगारांच्या पगाराचे 12 लाख 50 हजार रुपये घेऊन पोबारा केला होता. चिपळूणातील खेर्डीमधील थ्री एम पेपर मिलमधील कामगारांना 3 महिनयांचा पगार घेवून तिघेजण फरार झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांच्या गुजरात येथे मुसक्या आवळल्या.

सविस्तर वृत्त असे की, सौरभ यादव, रविसिंग यादव, पंकजकुमार याद (तिघे रा. उत्तरप्रदेश) हे तिघेजण थ्री एम पेपर मधील 40 कामगारांचे 3 महिन्यांचे वेतन 12 लाख 50 हजार रुपये घेवून सप्टेंबर 2020 मध्ये फरार झाले होते. पगार न मिळाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. कामगार व कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला होता.

मात्र या तिघांचा 2 वर्षे ठावठिकाणा लागत नव्हता. त्यांच्या मोबाईलवरुन लोकेशन ट्रेस करताना ते वेगवेगळया ठिकाणी दाखवत असल्यामुळे पोलीसांसमोर अनेक प्रश्न होते. पोलिसांनी खबर्‍यांमार्फत गोपनीय माहिती घेतली असता तिघेजण गुजरातमध्ये असल्याचे खात्रीलायक समजले. त्याप्रमाणे चिपळूण पोलीस येथून गुजरातला रवाना झाले. 

या पथकामधील पोलीस उपनिरीक्षक विनायक माने, हवालदार वृशाल शेटकर, पोलीस नाईक पंकज पडेलकर यांनी गुजरातमध्ये गेल्यानंतर त्यांच्याविषयी सगळी माहिती गोळा केली. तिघेही एकाच ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. 2 वर्षानंतर आपल्याला पोलीस पकडतील याची तिघांना पुसटशी कल्पनाही नव्हती. या सापळयात अलगद सापडले. अचानक पोलिसांनी पकडल्याने त्यांची धांदळ उडाली. पोलिसांनी बुधवारी रात्री त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी करुन अटक करण्यात आले.  त्यानंतर त्यांना चिपळूणात घेवून आले.