काजू बी तारण योजनेंतर्गत दीड कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही जिल्ह्यात काजू बी शेतमाल तारण योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात शेतमाल तारण योजनेंतर्गत दीड कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

बदलत्या हवामानाचा परिणाम पिकावर झाल्याने काजूचे उत्पादन अल्प आहे. काजू बी एकाचवेळी बाजारात आल्यास दर कोसळतात, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यापेक्षा शेतकऱ्यांना काजू बी न विकता कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतमाल तारण ठेवता येते. त्या दिवसाच्या बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज १८० दिवसांकरिता (सहा महिने) वार्षिक सहा टक्के व्याजाने उपलब्ध करून देता येते. खरेदी करताना काजू बीची आर्द्रता ५ टक्के असणे अपेक्षित आहे. शेतमाल तारण ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी येताना सातबारा, आधारकार्ड झेराॅक्स, बॅंक खात्याचा तपशील जोडणे आवश्यक आहे. या योजनेला दहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली असली तरी सुरुवातीला एक दोन शेतकरीच याचा लाभ घेत होते; मात्र गेल्या पाच वर्षांपासून या योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान, सिंधुरत्न योजना शेतमाल तारण योजनेशी संलग्न करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जेणेकरून काजू बी प्रोसेसिंगच्या छोट्या युनिटस् धारकांनाही कर्ज वितरण करण्यात येणार आहे. जर या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर पाच कोटी अर्थसाहाय्याचे उद्दिष्ट कृषी उत्पन्न बाजार समितीने निश्चित केले आहे.