संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथे काजूच्या बागेची साफसफाई करताना लावलेल्या आगीत होरपळून प्रौढाचा दुदैवी मृत्यू झाला. संजय विठ्ठल लोकम (वय ४९, रा. करंडेवाडी- बामणोली, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याची खबर संजयचा भाऊ विजय लोकम यांनी दिली. संजय हे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास काजूची बाग साफ करण्यासाठी गेले होते; मात्र ते सायंकाळी चार वाजेपर्यंत घरी आलेच नाहीत, म्हणून संजय यांचा भाऊ विजय हे त्यांना बघायला गेले. काजूच्या बागेच्या दिशेने जात असतानाच संजय हे आगीत होरपळलेल्या स्थितीत दिसून आले. या वेळी संजय यांना हाक मारून त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने विजय यांनी वाडीतील ग्रामस्थांच्या साहाय्याने त्यांना देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी संजयला मृत घोषित केले.