रत्नागिरी:- शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना त्रास होत आहे. कोणीही कुठूनही वाहन चालवत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. सकाळच्या सत्रात पोलिस असल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळतो; मात्र दुपारी व रात्री वाहनचालक अचानक रस्त्यावर येतात. त्यामुळे पादचाऱ्यांमध्येही भिती निर्माण झाली आहे.
शहरात काँक्रिटीकरण केलेल्या भागात रस्त्याच्या बाजूला खडी पसरून ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी काम अपूर्ण स्थितीत आहे. या कामामुळे त्या भागातील रहिवाशांना इमारतीमध्ये ये-जा करणे कठीण होते; मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होते. हे काम एका बाजूने न करता प्रत्येक भागात थोडे थोडे करण्यात येत आहे. काम अर्धवट असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना, इमारतींना रहिवाशांना तसेच वाहनचालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेचे काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे वाहनचालक खडीच्या रस्त्यातून मार्गक्रमण करतात. रस्त्याच्या एका बाजूचा भाग खाली असल्यामुळे चालकांना कसरत करावी लागते. काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या कडेला खडी तशीच ठेवण्यात आलेली आहे. त्या खडीवरून दुचाकीचालक कसरत करत सरळ रस्त्यावर येत आहेत. त्या ठिकाणी डांबर किंवा काँक्रिटीकरण करून तो कडेचा भाग सपाट करणे आवश्यक आहे; मात्र खडी तशी ठेवण्यात आल्यामुळे वाहने घसरून पडत आहेत. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे मोठा अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. एका बाजूचे काम परिपूर्ण नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ होत आहे. पोलिसांनी पाठ फिरवली की, मात्र इकडून तिकडे जाण्यासाठी स्वार मिळेल त्या जागेतून दुचाकी चालवतात.