रत्नागिरी:-अज्ञात कारणातून सख्ख्या भावाने थोरल्या भावाच्या डोक्यात सुऱ्याचे घाव घालून खून केल्याची घटना राजापूर तालुक्यातील कशेळी सावरेवाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांताराम जाणू ठकरुळ (वय-६५) व महादेव ठकरुळ हे दोघे सख्खे भाऊ असून यातील महादेव हा कामानिमित्त मुबंई येथे होता. मागील लॉकडाऊनच्या काळात तो आपल्या गावी आला होता. हे सर्वजण एकत्र रहात होते. गुरुवारी शांताराम यांच्या घरातील सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी महादेव व शांताराम हे दोघेच घरामध्ये होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शांताराम हे घरात खुर्चीवर बसलेले असताना महादेव पाठीमागून हातात सुरा घेऊन आला व बेसावध बसलेल्या शांताराम यांच्या डोक्यात सुऱ्याचे दोन घाव घालून त्यांचे डोके छिन्नविच्छिन्न केले. यावरच न थांबता बेभान झालेल्या महादेव याने शांताराम यांच्या मानेवर, हातावर वार करून घरातून पळ काढला.
डोक्यात सुऱ्याचे दोन घाव बसल्याने शांताराम हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.याप्रकरणी नाटे पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान महादेव याने क्रूरपणे भावाचा खून का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा पुढील तपास नाटे पोलीस करीत आहेत.