खेड:- अलिबाग-मुंबईहून गोव्याकडे जाण्यासाठी वाहनचालकांच्या दृष्टीने सोईस्कर असलेला मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा होत आहे. कालच शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. मात्र, त्यांचा चालक आणि दोन पोलीस कर्मचारी यात जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा भीषण अपघात घडला आहे. कशेडी घाटात मारुती स्वीफ्ट कारला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मारुती स्वीफ्ट कारला आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात स्वीफ्ट कार आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्री याच कशेडी घाटात दापोली-खेडचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला देखील अशाच प्रकारे अपघात झाला होता. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट बनतोय मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसत आहे.
गेल्या 13 वर्षांपासून मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असल्याने हा रस्ता प्रवासी आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अपघातांमुळे या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर जानेवारी – नोव्हेंबर 2022 या कालावधीत झालेल्या 129 प्राणांतिक रस्ते अपघातात 150 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीतून उघडकीस आले आहे.