कशेडी घाटात अपघात; ५० फूट खोल दरीत कोसळली बस

रत्नागिरी:- खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कशेडी घाटात बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. चिंतामणी नावाची ही खासगी बस मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात असतानाच हा अपघात झाला. बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आलं असून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस दरीत कोसळून हा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तात्काळ बचावकार्य सुरु करत २५ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. दुर्दैवाने सात वर्षाच्या एका लहान मुलाला अपघातात जीव गमवावा लागला आहे. जखमींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण समजलं नसून पोलीस तपास करत आहेत.