रत्नागिरी:- मुलभुत आणि पायाभुत सुविधा पुरविण्याकडे कर्ला ग्रामपंचायतीचे सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा आक्षेप घेत कर्ला ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा काढला. खड्डे मुक्त व सुंदर रस्ते झालेच पाहिजे, स्वच्छ, शुद्ध व मुबलक पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्चा खाली करा, अशा घोषणांनी शेकडो ग्रामस्थांनी कर्ल्या परिसर दणाणून सोडला.
निसार मुल्ला यांच्यासह अन्य काही लोकांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सकाळी साडे अकरा वाजता कर्ला गावातून निघाला. या मोर्चाला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या मनमाणी कारभाराबाबत त्यांच्या मनात खदखद होती. विद्यमान सत्ताधाऱ्यांवर ग्रामस्थांचा पायाभुत सुविधांसाठी रोष होता. सुंदर रस्ते झालेच पाहिजे, शुद्ध व मुबलक पाणी मिळालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्चा खाली करा, अशा घोषणा ते हा मोर्चा ग्रामपंचायीवर निघाला. शिस्तीत हा मोर्चा ग्रामपंचायतीपर्यंत गेला आणि ग्रामपंचायतीच्या इमारतीपुढेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली परखड मते मांडली. यामध्ये निकास मुल्ला म्हणाले, तीन वर्षांमध्ये कर्ल्यातील रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. गावाच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे. परंतु ग्रामपंचायतीने कचरा निर्मुलनाची कोणतीच व्यवस्था केलेली नाही. बंदारव ग्रामस्थ कचरा टाकतात. गाव कचऱ्याच्या विळख्यात आले आहे. त्यामुळे मलेरिया, चिकन गुणीया या सारखे साथीच्या रोगांचा सामना करावा लागतो. रस्ता देणे, कचरा मुक्त गाव करणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सर्वजनिक गटारांचीही तिच परिस्थिती आहे. सार्वजनिक शौचालयाची एवढी दुरदशा झाली आहे की जीवंत माणून शौचकरायला जाऊ शकत नाही. गावच्या या परिस्थितीला विद्यमान सत्ताधारी आणि सरपंचच जबाबदार आहेत. ग्रामपंचायत गावाला अशुद्ध पाणी पुरवठा करू शकत नाही. पाण्याचे नमुने तपासले असता ते पिण्यास योग्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली दिड वर्षे आम्ही सत्ताधाऱ्यांशी पत्रव्यवहार करीत आहोत. त्यांना निवेदन दिले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. जनतेचे कोणतेही मत एकुण न घेता मनमानी कारभार सुरू आहे. म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. आता त्यांनी कारभार सुधारला नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.