मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांचे आश्वासन
रत्नागिरी:- जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचार्यांचे वेतन देयके उशीरा पाठवणार्या संबंधित कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करावी. तसेच वेतन देयके वेळेत होण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांना तालुका स्तरावर पर्यवेक्षिय अधिकारी म्हणून वेतन विषयक कामकाज पहाण्याची जबाबदारी दिली जाईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी दिले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे आरोग्य पर्यवेक्षक ,औषध निर्माण अधिकारी, पुरुष व महिला आरोग्य सहाय्यक , आरोग्य सेवक , सफाई कामगार पुरुष परिचर ,स्त्री परिचर या संवर्गातील जवळजवळ २५० कर्मचारी वेतन न झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीसाठी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आले होते. यावेळी संघटनेकडून व सर्व संवर्गातील कर्मचार्याकडून प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनात प्रामुख्याने ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची वेतन देयके दि. २० तारखेनंतर सादर केली आहेत अशा प्रा. आ. केंद्रांच्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन योग्य कठोर प्रशासकिय कारवाई व्हावी. जुलै २०२३ या महिन्यात अनुदान येऊन सुध्दा अनुदान मागणी शिवाय वेतन देयके पाठविलेल्या शृंखलेतील सर्व अधिकारी, कर्मचार्यांवर कठोर प्रशासकिय कारवाई करण्यांत यावी. पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे वेतन करणेसाठी पंचायत राज सेवार्थ प्रणालीत वेतन देयके विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास अथवा वेतन होण्याला विलंब झाल्यास संबंधित कार्यासन कर्मचारी व अधिकारी यांना सर्वस्वी जबाबदार धरून दंडात्मक कारवाई प्रस्तावित करावी.
जिल्हा स्तरावर वेतन देयकांबाबत कामकाज पहाणीची जबाबदारी निश्चित करावी. जिल्हा स्तरावरुन वेतन देयके किती आला व कोणत्या संस्थाची वेतन देयके आली नाहित यासाठी पर्यवेक्षिय अधिकारी याची जबाबदारी निश्चित करावी. पंचायत समिती स्तरावरून वेतन देयके वेळेत सादर करणेसाठी आदेशीत करावे व पंचायत समिती स्तरावरुन वेतन देयके वेळीच तपासून होतील या साठी सुचना दयाव्यांत पंचायत समिती स्तरावर या करीता पर्यवेक्षिय अधिकारी म्हणून जबाबदारी निश्चित करावी. क्षेत्रीय स्तरावरील लेखा व आस्थापना विषयक कामकाज पहाणारे कर्मचारी यांना क्षेत्रिय कार्यालयात नियमित कामकाज पहाण्यांच्या सुचना देण्यात याव्यात.
नियमित वेतनाव्यतिरीक्त मागणी न करता ज्या संस्थांनी अनुदान वापरले त्यांचेवर कठोर कारवाई करावी. वेतनाबाबत पाठपुरावा करण्यांची जबाबदारी असणार्या कर्मचार्यांकडून जबाबदारी पार न पाडल्याबददल कठोर कारवाई करावी. वेतन चिठीचे लॉगिन पासवर्ड कर्मचार्यांला देण्यांत यावेत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आरोग्य कर्मचार्यांच्या वतीने प्रशांत कांबळे, परशुराम निवेंडकर, आरोग्य सहाय्यक कमलेश कामतेकर, आरोग्य सेवक राजेंद्र रेलेकर आरोग्य विस्तार अधिकारी, बंड्या भस्मे, रमेश उमते, विवेक गावडे, उत्तम देवकाते, शेषराव राठोड औषध निर्माण अधिकारी, नर्सेस संघटनेच्या सपना नाईक , मुग्धा अभ्यंकर, माधवी ठाकूर देसाई, परिचर संघटनेचे दीपक पालांडे, हवालदार संघटनेचे विलास पवार हे सहभागी झाले होते यांचे सह जिल्ह्यातील २५० कर्मचारी यावेळी उपस्थित होते.