कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला दमदाटी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मी जिल्हापरिषदेच्या साहेबांच्या गाडीवर आहे, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही, मी पोलीस बिलीस मानत नाही, तू इथून निघून जा नाहीतर मी तुला मारेन असा दम कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसालाच भरत मारहाण केल्याची घटना रत्नागिरी शहरातील कोकण नगर भागात घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी दिलीप राठोड हे आपल्या पत्नीला मारहाण करीत असल्याची तक्रार ३० सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ९ च्या सुमारास त्यांची पत्नी सौ. प्राजक्ता यांनी पोलीस स्थानकात दूरध्वनी करून दिली. हि तक्रार मिळताच या महिलेच्या बचावासाठी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे महेंद्र काशिनाथ खापरे (वय ३९ पोहेकॉ) हे ठाणे अंमलदार यांच्या आदेशाप्रमाणे घटनास्थळी रवाना झाले. प्राजक्ता यांच्या घरी पोहचल्यावर तेथे त्यांचे पती त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करताना निदर्शनास आले.

नवरा बायकोचे हे भांडण सोडवण्यास पोहेकॉ खापरे पुढे झाल्यावर ‘तू कोण पोलीस, तू इथे कशाला आलास असे म्हणत संशयित आरोपी दिलीप राठोड हा शिवीगाळ करू लागला. याचवेळी सेकंड मोबाईल अंमलदार पोहेकॉ साळवी हे राठोड याला समजावून सांगत असताना खापरे यांना शिवीगाळ करीत मी कोण आहे तुला माहित नाही, मी जिल्हा परिषदेच्या साहेबांच्या गाडीवर आहे, माझे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत पोहेकॉ यांना मारहाण करून दोन्ही हाताने गळा दाबत सरकारी कामात अडथळा केला. तसेच पोलीस सार्वजनिक रस्त्यावर आले असता आरोपीने दारूच्या नशेत पुन्हा शिवीगाळ करीत आरडओरडा केला. या प्रकरणी संशयित आरोपी दिलीप शंकर राठोड याच्यावर रत्नागिरी शहर पोलिसात.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.