दापोली:- कराड येथील पवार अभियंता याने दापोलीतील चंद्रनगर येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथे दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अभियंत्याने आत्महत्या केली. चंद्रकांत जगदाळे हे कामानिमित्त दापोलीला जात असताना दापोली चंद्रनगर रस्त्यालगत असणाऱ्या झाडाला अनोळखी व्यक्तीने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तत्काळ घटना घडली त्या ठिकाणी धाव घेतली. चंद्रकांत जगदाळे यांनी याबाबत खबर दापोली पोलिस स्थानकात दिली. मयत व्यक्ती हा दापोलीतील नसून अनोळखी असल्याने त्याचा ठावठिकाणा समजत नव्हता. त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात सुमारे तीन एटीएम कार्ड, पैसे, कराड ते दापोली असे बसचे तिकीट, इलेक्शन कार्ड अशा गोष्टी आढळून आल्या. या माहितीच्या आधारे संपर्क केला असता तो मूळचा कराड येथील असून अभियंत्याचे शिक्षण पूर्ण केलेले होते. काही कामानिमित्त तो कोकणात आला असल्याचे समजले आहे. दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.