रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथील चिरेखाणीवरील डिझेल आणि इतर लोखंडी सामान असा एकूण 82 हजार रुपयांचा मुददेमाल लांबवणार्या 4 संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. यातील पाचव्या संशयित हा विधीसंघर्षित बालक आहे. चोरीची ही घटना 8 जुलै रोजी रात्री 9 ते 9 जुलै 2023 रोजी सकाळी 7.30 वा.कालावधीत घडली आहे.
संदीप उर्फ खली सावळा गोसावी (32),अजय सावळा गोसावी (29), मनोज तानाजी गोसावी (27, रा.निवळी फाटा रावणंगवाडी, रत्नागिरी), इब्राहिम उर्फ छोटू आदम शेख (26, मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा.निवळी, रत्नागिरी) आणि एक विधिसंघर्षित बालक या सर्वांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात अरविंद काशिनाथ ओर्पे (42,रा.लाजुळ करबुडे,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार,8 जुलै रोजी अरविंद कोर्पे त्यांचा मित्र प्रविण पांचाळ सोबत रत्नागिरीला जायचे असल्याने सायंकाळी 6 वा.खाणीवर गेले होते. मित्राची वाट पाहत असताना रात्री 8.45 वा.प्रविण पांचाळने अरविंद ओर्पे यांना फोन करुन रत्नागिरीत जायचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे खाणीवर थोडावेळ थांबून रात्री 9 वा. ते घरी परतले होते.
त्यानंतर दुसर्या दिवशी 9 जुलै रोजी सकाळी 7.30 वा.अरविंद ओर्पेंच्या खाणीवर काम करणारा कामगार श्याम ओर्पेने त्यांना फोन करुन खाणीवरील सामान चोरीला गेल्याचे सांगितले. अरविंद ओर्पे यांनी तातडीने खाणीवरील सामानाच्या खोलित जाउन पाहिले असता त्यांना एक ई-श्रम कार्ड पॉकेट साईज बनवलेले व लॅमिनेशन केलेले मिळाले. त्यांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी तपास करताना ग्रामीण पोलिसांनी सोमवारी यातील संशयितांना अटक केली.