तीन तास अडकून देखील सर्व प्रवासी सुखरूप
रत्नागिरी:- आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे बोगदा वायुविजन (व्हेंटीलेशन) यंत्रणा प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देत आहे. चोविस तास कार्यरत असलेल्या या यंत्रणेमुळे शनिवारी (ता. 26) करबुडेत अडकुन पडलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवासी तीन तास सुरक्षीत राहीले.
कोकण रेल्वे मार्गावरील 58 बोगद्यांपैकी सर्वात मोठा बोगदा म्हणून करबुडेची ओळख आहे. या ठिकाणी इंजिन बिघडल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाने उत्कृष्ट यंत्रणा राबवली आहे. हा बोगदा साडेसहा किलोमीटर लांबीचा असून तो पार करण्यासाठी सहा ते सात मिनिटे लागतात. गाडी बोगद्यात शिरली की वायुविज यंत्रणा सुरु होते. ती बाहेर पडल्यानंतर आतील वायु अजस्त्र फॅनच्या मदतीने बाहेर फेकला जातो. बोगद्यात गाडी बंद पडल्यानंतरही कोणत्याही प्रकारच्या आरोग्यच्या तक्रारी प्रवाशांना उद्भवणार नाहीत याची व्यवस्था केली आहे. बोगद्यात विविध प्रकारचे वायू किंवा गॅस तयार होतात. त्यात मिथेन कार्बनडाय आँक्साईड, कार्बन मोनाक्साईडचा समावेश आहे. त्याचा त्रास प्रवाशांना होऊ शकतो. बराच काळ आतमध्ये राहील्यास गुदमरणे, उलट्या होणे, धुराचा त्रास होणे यासारख्या घटना घडू शकतात. वायुव्हिज ही यंत्रणा कार्यान्वित राहिली की धुर बाहेर निघून जातो. शनिवारी पहाटेच्या सुमारास राजधानी एक्स्प्रेस लाजूळच्या बाजूने एक किलोमीटर अंतरावर दुर्घटनाग्रस्त झाली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नव्हती. गाडी बाहेर काढण्यासाठी सुमारे तीन तासाचा कालवधी लागला. या काळात वायुवीज यंत्रणा कार्यान्वित राहील्यामुळे प्रवाशांना कोणताही त्रास झाला नाही. पनवेल येथून गोव्याकडे जाणार्या एका प्रौढ प्रवाशाने पत्रकारांशी बोलताना बोगद्यामध्ये तीन तास उभे होतो, मात्र कोणती समस्या उद्भवली नाही असे स्पष्टपणे सांगितले.