करबुडे बोगद्यातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी चार जणांची समिती 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे बोगद्यात राजधानी एक्स्प्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी चार जणांची समिती स्थापन केली आहे. सोमवारी (ता. 28) या समितीने प्रत्यक्ष बोगद्यात जाऊन पाहणी केली. त्यांच्या अहवालानंतर अपघातांचे मुळ कारण पुढे येणार आहे.

शनिवारी (ता. 26) पहाटे करबुडे बोगद्यामध्ये दरड कोसळल्यामुळे राजधानी एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. सुदैवाने या दुर्घटनेत प्रवाशांना दुखापत झाली नाही; मात्र आशिया खंडात सर्वात मोठा असलेल्या या बोगद्यामध्ये प्रवासी रेल्वे गाडी दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे गांभिर्यात भर पडली आहे. बोगद्यामध्ये माती घसरु नये यासाठी शॉट क्रिकींग (सिमेंट काँक्रिटीकरण) केले जाते. पावसाळ्यापुर्वी मार्गाचीही तपासणी होते. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी दुरुस्त्या करण्यात येतात. तरीही हा प्रकार घडल्यामुळे याची कसून चौकशी सुरु झाली आहे. बोगद्यात भलामोठा दगड, माती खाली रुळावर आली होती. मातीचा एका भागाच सरकल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. हे प्रकार टाळण्यासाठी आणि कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना सुरु केल्या आहेत. दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्यातील चारही अधिकार्‍यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्याचा अहवाल कोकण रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात भुगर्भतज्ज्ञांकडूनही पाहणी केली जाणार असल्याचे समजते.