रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथे ट्रकने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील कॉलेज तरुणी जागीच ठार झाली तर चालक गंभीर आहे. हा अपघात आज दुपारी साडे बारा वाजता करबुडे फाटा येथे झाला आहे. दोघेही सांगली जिल्ह्यातील आहेत.
कोमल तानाजी सावंत (वय 22, रा. तासगाव, जि. सांगली) असे अपघातातील मृताचे नाव आहे. तर सुरज संपत पाटील (वय 29, सांगलेवाघ गल्ली, ता. शिराळा, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. जयसिंगपुरहुन (जि. सांगली) ही दोघे गणपतीपुळे येथे दुचाकीवरून फिरण्यासाठी आले होते. निवळी ते गणपतीपुळे असा प्रवास करीत असताना करबुडे फाट्यापासून काही अंतरावर समोरून आलेल्या ट्रकने हुलकावणी दिली. दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने रस्ता सोडून दुचाकी खाली कोसळली. या अपघातात दोन्ही स्वार गंभीर जखमी झाले. त्यापैकी मुलगी कोमल सावंत हिला जबर मार बसल्याने जागीच मृत्यू झाला. तर सुरज पाटील गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, या अपघातातील मृत मुलगी जयसिंगपुर येथे वैद्यकिय शिक्षण घेत असून ती शेवटच्या वर्षाला होती. तर मुलगा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहे. त्यामुळे दोघे रत्नागिरीत येण्याचा नेमका उद्देश अजून स्पष्ट झालेला नाही. पोलिस निरीक्षक सुरेश कदम याचा अधिक तपास करीत आहेत.