रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली.
स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. करबुडे, रत्नागिरी) आणि सफी उल्ला समीर सोलकर (रा. कोकणनगर, रत्नागिरी) या दोघांना रत्नागिरी, सिंधूदूर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस ठाणे अभिलेखावर असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी तडीपारीची कारवाई करयात येत असते. यामध्ये अंमली पदार्थ संबंधित गुन्हे, शरीराविषयी गुन्हे, मालमत्तेविषयी गुन्हे व इतर गंभिर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. सन 2024 मध्ये जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून एकूण 7 सराईत गुन्हेगारांविरुध्द तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर सन 2025 मध्ये आज पर्यंत 2 सराईत
गुन्हेगारांविरुध्द तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.