रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे 11 सक्शन पंपाद्वारे खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. ना रॉयल्टी, ना परवानगी तत्वावर सुरू असलेल्या या वाळू उपशाला खनिकर्म, महसूलचा आशीर्वाद असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून करजुवे तिसंग परिसरात अवघ्या एक ते दीड कि.मी. अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. देवरूख तहसील कार्यालयात ग्रामस्थांनी तक्रारी करूनही हा वाळू उपसा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महसूल कर्मचारी गावात असतानाही सुरू असलेल्या या बेसुमार वाळू उपशाबाबत स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सक्शनद्वारे सुरू असलेला वाळू व्यवसाय तत्काळ बंद करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक महसूल यंत्रणेला तालुकास्तरावरून कोणावरही कारवाई करू नये असे सक्त आदेश असल्याची चर्चा करजुवे परिसरात सुरू आहे. त्यामुळे स्थानिक महसूल कर्मचारी कारवाई करत नसल्याची चर्चाही सुरू आहे. रत्नागिरी येथील खनिकर्म विभागानेही कारवाई करणे अपेक्षित असताना वाळू माफियांवर चाप का बसवला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खनिकर्म विभाग व वाळू माफियांमध्ये अर्थपूर्ण संबंध आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
करजुवे येथून डिंगणीमार्गे ठिकठिकाणी वाळूचे डंपर धावत असताना डिंगणीत असलेल्या पोलिस दूरक्षेत्र, संगमेश्वर येथील पोलिस स्थानकाकडून कानाडोळा का केला जात आहे? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. खनिकर्म विभाग, महसूल व पोलिस खात्याकडून या वाळू माफियांची का पाठराखण केली जात आहे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लाखो रुपयांचा महसूल बुडतोय
करजुवेमध्ये कोणीही साधी हातपाटीची रॉयल्टी घेतलेली नाही. लाखो रूपयांचा महसूल बुडवून खुलेआम वाळूचे ढीग या गावामध्ये ठिकठिकाणी दिसून येत आहे. मात्र गावातील तलाठी, मंडल अधिकारी यांना मात्र हे ढीग दिसत नाहीत. त्यामुळे या वाळू माफियांचे साधले आहे.