कमी जागेत अधिक बीज, पाणी न बदलता व्हेनामी जातीच्या कोळंबीचे यशस्वी उत्पादन

रत्नागिरी:- कमी जागेत अधिक बीज आणि पाणी न बदलता खार्‍या पाण्यात एल व्हेनामी जातीच्या कोळंबी संवर्धनाचा यशस्वी प्रयोग रत्नागिरीतील अ‍ॅक्वा ग्रुपच्या रजनीश महागावकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केला आहे. सुमारे दोनशेहून अधिक किलो व्हेनामीचे उत्पादन हाती आले असून, बायोफ्लॉक पद्धतीचा असा कोकणातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

बायोफ्लॉक पद्धतीत कोळंबीला घातलेल्या अन्नापैकी उरलेले अन्न अन कोळंबीची विष्ठा एकत्र करून त्याचे बॅक्टेरियात रूपांतर करून ते खाद्य म्हणून वापरले जाते. हे चिंगळांचे प्राथमिक खाद्य आहे. यामध्ये तयार होणारी जैविक प्रवाळं कोळंबीला अन्य आजार होऊ देत नाहीत. रासायनिक औषधांचा वापर झालेला नसल्याने नैसर्गिक कोळंबीचे उत्पादन यामधून मिळाले आहे. यामध्ये महागावकर यांच्यासह अमोल पवार, अमित मुळे, प्रसन्न पेठे यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये एका टाकीत २० हजार तर दुसर्‍या टाकीत १५ हजार बीज सोडण्यात आले. त्यानंतर नियमित तपासणी चालू केली. त्यात ऑक्सिजन ६.५० मिलिग्रॅमच्या वर ठेवणे, अमोनिआ ०.२५ ते ०.५० पीपीएमपेक्षा खाली राखणे यावर भर दिला गेला तसेच नायट्राईटचे प्रमाण शून्य ठेवल्यामुळे कोळंबीची वाढ चांगली होऊ लागली. या प्रणालीत पाणी बदलायला लागलेले नाही. फक्त कोळंबीची तयार होणारी विष्ठा काढून टाकण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली होती. बीज टाकल्यानंतर दोन महिन्यांनी प्रतिदिन ५० किलो विष्ठा काढून टाकली जात होती. बुधवारी (ता. ८) कोळंबी उत्पादन काढण्यात आले. त्यात २० ग्रॅमपासून ३५ ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची कोळंबी मिळाली. यासाठी लागणारे समुद्राचे पाणी मिरकरवाडा येथून आणण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्च आला तसेच चार महिन्यात १९५ किलो खाद्य लागले. गतवर्षी हा प्रयोग केला होता त्यात अनेक त्रुटी होत्या. ३ ते ४ ग्रॅमपुढे कोळंबीची वाढच झाली नव्हती. दुसर्‍या प्रयोगात त्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी एका टाकीतील कोळंबी काढण्यात आली. सुमारे दोनशे किलो कोळंबी मिळाली आहे. टाकीमध्ये बायोफ्लॉक पद्धतीने केलेल्या कोळंबी संवर्धन प्रकल्पाबाबत कोकण कृषी विद्यापिठाच्या मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. सुरेश नाईक, डॉ. पी. इ. शिनगारे यांनी समाधान व्यक्त केले.